मुंबई । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्ताने शासनाकडून लोकमान्य महोत्सव आणि लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्यात आले. या अभियानात आणि स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावरील गणेशमंडळे आणि मूर्तीकार यांना मिळून 666 जणांना पारितोषिके देऊन लवकरच गौरविण्यात येत असल्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी संजय फांजे, सुरेश सरनौबत, हेमंत रासने, नरेश दहिबावकर यांच्यासह या अभियानाचे इतर पदाधिकारी आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
631 गणेश मंडळे तर 35 मूर्तीकार बक्षीसाला पात्र
या स्पर्धेत एकूण 1681 गणेशमंडळांनी सहभाग घेतला.त्यापैकी 631 गणेश मंडळे तर 35 मूर्तीकार बक्षीसाला पात्र ठरले आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या परंतू बक्षीसास पात्र न ठरलेल्या 1015 गणेशमंडळांनाही प्रत्येकी 5 हजार रुपयांचे सहभागिता पुरस्कार देण्यात येतील. पारितोषिक विजेत्या गणेश मंडळामध्ये तालुका जिल्हा आणि विभाग स्तरावर प्रथम पारितोषिक मिळवलेल्या मंडळांची संख्या 262 इतकी आहे. द्वितीय पारितोषिक विजेत्यांची संख्या 223 इतकी आहे तर तृतीय पारितोषिक विजेत्यांची संख्या 181 इतकी आहे. यामध्ये 35 गणेशमूर्तीकारांचाही समावेश आहे.लोकमान्य महोत्सवाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दीपक टिळक, श्रीमती मुक्ता टिळक, हेमंत रासने, जयेंद्र जयंत साळगावकर, संजय यादवराव, नरेश दहीबावकर यांच्यासह 29 जणांची राज्यस्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आली आहे, असेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. मुंबई आणि मुंबई उपनगरातील गणेश मंडळांची संख्या लक्षात घेऊन या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विभाग निश्चित करण्यात आला होता, असेही ते म्हणाले.