मूलभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याने भोई समाजबांधवांचा भुसावळ पालिकेवर मोर्चा

0

बंद पथदिव्यांसह गटारींची स्वच्छता करण्याची मागणी ; नागरीकांना साथीचे आजार होण्याची भीती

भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये मूलभूत सोयी-सुविधांना पालिकेकडून बगल दिली जात असल्याने संतप्त समाजबांधवांनी बुधवारी सकाळी 11 वाजता पालिकेच्या गोपाळ नगरातील कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. नागरी समस्यांकडे प्रभाग आठमधील नगरसेवक तसेच नगरपालिका प्रशासन मुद्दाम दूर्लक्ष करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रभागातील अस्वच्छता दूर करावी, गटारींची सफाई व्हावी तसेच बंद पथदिवे सरू करावेत, अशी मागणी प्रसंगी करण्यात आली.

समस्या सुटत नसल्याने पालिकेवर मोर्चा
प्रभाग क्रमांक आठमधील रहिवासी तथा भोई समाज सर्वांगिण विकास संस्थेतर्फे बुधवारी सकाळी 11 वाजता पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. प्रभाग आठमधील भोईनगर भागात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरी सोयी-सुविधांपासून वॉर्ड आणि परीसर मुद्दामपणे वंचीत ठेवला जात असून कोणताही लोकप्रतिनिधी, नगरसेवक किंवा नगरपालिका लक्ष देण्यास तयार नाही. मुद्दामपणे या सर्व प्रश्नी दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरीकांना साथीचे आजार होऊन तसेच रोगराई पसरुन जीवीतहानी होण्याची भीती मोर्चेकर्‍यांनी व्यक्त केली तसेच उपमुख्याधिकारी श्रीपाद देशपांडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. भोई नगरातून जळगावरोड, प्रभाकर हॉलमार्गे मोर्चा पालिकेवर धडकला. विविध गर्‍हाणे मांडून प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. या मोर्चात भोई समाज सर्वांगीण संस्थेचे पदाधिकारी तसेच रहिवासी गणेश भोई, सुरेश भोई, रमेश भोई, राजू भोई, विजय भोई, सुरेश भोई, ज्ञानेश भोई, सीताराम भोई, शांताराम भोई आदींसह नागरीक सहभागी झाले होते.

अशा आहेत मोर्चकर्‍यांच्या मागण्या
प्रभाग आठमधील सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृहाची नियमितपणे साफसफाई केली जावी, सार्वजनिक गटारी नादुरुस्त असल्याने त्या तुंबून दुर्गंधी व डासांचा उत्पत्ती वाढल्याने गटारींची निर्मिती व नियमित स्वच्छता करावी, विजेच्या खांबावरील दिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने चोर्‍या व लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत, यामुळे इलेक्ट्रीक पोलवर त्वरीत अधिक प्रकाश देणारे दिवे बसविण्यात यावेत, प्रभागात गेल्या सहा महिन्यांपासून अवेळी पाणीपुरवठा होतो तसेच पाणीपट्टी मात्र वसूल केली जाते, मालमत्ता कर व अन्य वाढविलेले टॅक्सेस असुविधांमुळे कमी करून देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या.

मोर्चेकर्‍यांच्या मागणीची दखल -नगराध्यक्ष
मोर्चेकर्‍यांनी नियमित स्वच्छतेची मागणी केली होती त्याबाबत पालिका कर्मचार्‍यांना सूचना केल्या आहेत शिवाय अन्य समस्याही लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.