भुसावळात गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंचे राष्ट्रीय व्याख्यानातून प्रबोधन
भुसावळ- घराघरात पुंडलिक तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न आहेत. विद्यार्थ्यांना कसे घडवावे, शिक्षकांनी कसे शिकवावे, समाज व कुटूंबशास्त्र हे मुल्य शिक्षणातून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहे. विविध विभागांच्या माध्यमातून समाजसुधारणा व समाज स्वामीभक्तीकडे वळविण्याचे काम केले जात आहे. 700 वर्ष मोगल व त्यानंतर दीडशे वर्ष ब्रिटीश सत्ता या देशाने अनुभवली आहे. हल्ली वृध्दाश्रमातही वाढ झाली असून वीन पिढीला मुल्यशिक्षण मिळाल्यास कोणत्या आईवडीलांना वृध्दाश्रमात जाण्याचा कठीण प्रसंग येणार नाही, असे विचार श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरीप्रणीतचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील हुडको परीसरातील प्रांगणावर झालेल्या राष्ट्रीय संत्संगात हितगुज करताना बोलत होते. यावेळी राज्यासह मध्यप्रदेशातून तब्बल 20 हजार भाविकांची उपस्थिती होती.
वनस्पती व आयुर्वेदात मोठे सामर्थ्य
आहार व विहार बदलल्याने कॅन्सर रुग्णांची देशात संख्या वाढली आहे. हा आजार लवकर कसा बरा करायचा आहे. वनस्पतीचा काढा रुग्णाला दिला जातो. वनस्पती व आयुर्वेदात मोठे सामर्थ्य आहे, असेही गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे म्हणाले. महिला वर्गाने स्वयंपाक घरातील मसाल्याच्या डब्याकडे लक्ष दिले तर बहूतांश आजारांना वेळीच नियंत्रणात आणता येते. मसाल्याच्या डब्यात दोन डझन वस्तू आहेत, यासर्व वस्तू मानवी आरोग्यासाठी वरदान आहे. तेजपान, मिरा, हळद, दालचिनी, जिरे आदी सर्वच वस्तूंना अनन्यसाधारण महत्व आहे. महिलांनी या सर्व वस्तूंची माहिती घेतली तर कुटूंब आरोग्य संपन्न होतील, अशी माहितीही गुरुमाऊली मोरे यांनी दिली.