नवी दिल्ली: अलिकडच्या काळात नोकर्यांवर संकट येण्याची भीती व्यक्त केली जात असताना व काही आयटी कंपन्यांकडून कामगार कपात होत असल्याची चर्चा असतानाच या क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसने या वर्षात 20 हजार नवे कर्मचारी घेणार असल्याचे जाहीर करीत मोठा दिलासा दिला आहे.
भारतात आयटी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्राचे जाळे व्यापक होत असून त्यामुळे या क्षेत्रातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. देश विदेशातील आयटी कंपन्यांनी देशात आपले स्थान निर्माण केले असून इन्फोसिस ही मोठी कंपनी ठरली आहे. या कंपनीने अलिकडेच 400 जणांनाच कामावरून कमी केले होते. त्यामुळे या क्षेत्रातील नोकर्यांबाबत साशंकता व्यक्त होतानाच अन्य कंपन्याही असेच काहीसे निर्णय घेण्याची भीती निर्माण झाली होती. तथापी कंपनीने आतापर्यंत मूल्यांकनात नापास झालेल्या केवळ 400 जणांनाच कामावरून कमी केले असल्याचे स्पष्टीकरण इन्फोसिसने केले आहे.
कंपनीचे मुख्य कामकाज अधिकारी प्रवीण राव यांनी नुकतीच यासंदर्भात आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली व महत्वपूर्ण चर्चा केली. त्यावेळी राव म्हणाले, इन्फोसिसमध्ये दरवर्षी कर्मचार्यांचे मूल्यांकन कामगिरीवर आधारित होते. यंदा अशा मूल्यांकनानंतर 300 ते 400 जणांना कामावरून कमी करण्यात आले. तथापी नारायण मूर्ती यांनी नोकरकपातीसंदर्भात केलेल्या विधानावर भाष्य करणे मात्र राव यांनी टाळले.
आताच्या काळात तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत असल्यामुळे नव्या रोजगारांची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होत आहे.
प्रवीण राव,
कंपनीचे मुख्य कामकाज अधिकारी