न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही,15 दिवसाची मुदत
जळगाव- मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना आधी सरसकट बिले वितरीत करण्यात आली होती.परंतु काही गाळेधारकांनी हरकत घेवून जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली.नगररचना विभागातर्फे गाळ्यांचे फेरमूल्यांकन करुन 30 जूनपर्यंत बिले गाळेधारकांना वितरीत करण्यात आली असून बिलाची रक्कम नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. बिलाची रक्कम न भरल्यास लवकरच गाळे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिला.
मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. गाळे कराराने देण्याबाबत महासभेत अनेक ठराव करण्यात आले.परंतु गाळेधारकांनी विरोध दर्शविला होता. दरम्यान,तत्कालीन आयुक्तांनी गाळेधारकांना बिले भरण्यास सांगितले होते.त्यावेळी काही गाळेधारकांनी बिलातील काही रक्कम भरली,तर काही गाळेधारकांनी रक्कम भरली नाही.
जाहिर लिलावाची प्रक्रिया रखडली
मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेवून जाहिर लिलाव प्रक्रिया राबविण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला होता.त्यानंतर प्रशासनाने जाहिर लिलावाची प्रक्रिया सुरु केली होती.परंतु ही प्रक्रिया देखील रखडली.
नगररचना विभागाने केले फेरमूल्यांकन
गाळेधारकांना आधी सरसकट बिले दिली होती.त्यामुळे काही गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने गाळेधारकांची याचिका फेटाळली. आणि कलम 81 ‘क’ प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार नगररचना विभागाने फेरमूल्यांकन करुन 30 जून पर्यंत गाळेधारकांना बिले बजावली.
नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाची मुदत
थकीत रक्कम भरण्यासाठी गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली होती.मात्र गाळेधारकांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला.त्यामुळे पोस्टाने नोटीस देण्यात येत आहेत.नोटीस मिळाल्यापासून थकीत रक्कम भरण्यास 15 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत गाळेधारकांनी रक्कम न भरल्यास गणेश विसर्जनानंतर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी सांगितले.