पुणे । मूल दत्तक घेणार्या महापालिकेच्या महिला कर्मचार्यांना तीन महिने ते एक वर्षापर्यंत विशेष रजा देण्यासंदर्भातील महापालिका प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव महिला-बालकल्याण समितीने गुरूवारी एकमताने मंजूर केला. मात्र यासाठी अर्टीशर्तींचे पालनही करावे लागणार आहे. महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राणी भोसले यांनी याबाबतची माहिती दिली.
मूल दत्तक घेणार्या महिला कर्मचार्यांना विशेष रजा मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने 15 मार्च 2017 रोजी घेतला होता. त्या धर्तीवर महापालिकेच्या काही महिला कर्मचार्यांनी या रजेची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव प्रशासनाने समितीपुढे ठेवला होता.
या प्रस्तावानुसार, मूल दत्तक घेण्याच्या तारखेला मुलाचे वय एक महिन्याच्या आत असल्यास एक वर्षे, तर सहा महिन्यांपेक्षा जास्त आणि सात महिन्यांच्या आत असल्यास 180 दिवसांची रजा मिळणार आहे, तर मुलाचे वय एक वर्षांपेक्षा अधिक आणि तीन वर्षापेक्षा कमी असल्यास ही रजा 90 दिवसांची राहणार आहे. या रजेचा लाभ संबधित महिला कर्मचार्याला संस्थेकडून मूल दत्तक घेतल्यास दत्तक ग्रहण पूर्व पोषण देखरेख टप्प्यापासून लागू होईल. तर इतर प्रकरणी कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर ती रजा लागू होणार असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. मात्र या रजेसाठी अटीही घालण्यात आलेल्या असून, या अटींच्या पुर्ततेनंतरच ही रजा मंजूर होणार आहे.