जळगाव : मू.जे.महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे जुनी मोडी लिपीतील कागदपत्रे वाचण्याकरिता मोडी वाचक तयार व्हावे या हेतूने अक्षर ओळख करून देण्याकरिता 2 ते 7 जानेवारी दरम्यान सात दिवसीय मोडी लिपी परिचय वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 17-18 व्या शतकात राजदरबारी पत्रव्यवहारात व लोकव्यवहारात रूढ असलेली मोडी लिपी अलीकडे नव्या तंत्रज्ञान युगात कालबाह्य ठरली आहे. आजही घराघरातून खाजगी मालमत्तेची कागदपत्रे, विविध सरकारी कार्यालयांमधील जुनी दप्तरे मोडी लिपीत आहे. मराठ्यांच्या इतिहासावर नव्याने प्रकाश टाकण्याकरिता उपयुक्त ठरतील अशी लाखो कागदपत्रे अभिलेखागारांमधून अभ्यासकांच्या प्रतीक्षेत पडून आहेत. ही कागदपत्रे वाचण्याकरिता मोडी वाचक तयार व्हावे या हेतूने अक्षर ओळख करून देण्याकरिता सात दिवसीय मोडी लिपी परिचय वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. अधिक माहितीकरीता इतिहास विभागात संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी केले आहे.