जळगाव : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी चालू घडामोडींविषयी माहिती ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अद्ययावत होत असतो. त्याकरिता इतिहासासह वर्तमानातील घडामोडी ज्ञात असणे महत्वाचे ठरते, असे प्रतिपादन जळगाव मनपाचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी केले.
अण्णासाहेब डॉ. जी.डी. बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित स्पर्धा परीक्षा समिती, इतिहास व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मू.जे.महाविद्यालयात “स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेचे” आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत वर्षभर विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. यांतर्गत पहिले व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. प्रमुख वक्ते म्हणून मनपाचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेबाबत मूलभूत मार्गदर्शन त्यांनी केले व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करीत स्पर्धा परीक्षेबाबतचे समज-गैरसमज दूर केले. विचारमंचावर स्पर्धा परीक्षा समिती प्रमुख प्रा. देवेंद्र इंगळे, व्याख्यानमाला समन्वयक प्रा. राजीव पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण शिरोडे याने केले. तसेच अध्यक्षीय समारोप प्रा. देवेंद्र इंगळे यांनी केला.