मृतदेहाच्या शोधासाठी नौदलाला पाचारण

0

अश्‍विनी बिद्रे हत्या प्रकरण

नवी मुंबई : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांची अभय कुरुंदकर यानेच हत्या केल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. कुरुंदकर याने ज्या ठिकाणी बिद्रे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, त्या भाईंदरच्या खाडीतून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे शोधून काढण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नौदल, अग्निशमन दल व इतर तपास यंत्रणांना त्यांच्या अत्याधुनिक साधनांसह सोमवारी पाचारण केले आहे. पाणबुड्यांच्या सहाय्याने भाईंदर खाडीमध्ये बिद्रे यांच्या मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे.

मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले
सोमवारी सकाळपासून नौदल, अग्निशमन दलाचे पथक अत्याधुनिक पाणबुड्यांच्या सहाय्याने भाईंदरच्या खाडीमध्ये अश्‍विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा शोध घेणार आहे. अभय कुरुंदकर याने अश्‍विनीच्या मृतदेहाचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ते तरंगू नयेत, म्हणून वजनदार वस्तू बांधून खाडीत टाकल्याचे पोलिसांना आढळले आहे. त्यामुळे खाडीमध्ये मृतदेह अथवा त्यांच्या हाडाचे सांगाडे मिळतील, असे पोलिसांना वाटते. कुरुंदकर याने बिद्रे यांच्या मृतदेहाचे केलेले तुकडे ज्या फ्रीजमध्ये ठेवले होते, तो फ्रीज पोलिसांनी कुरुंदकर याच्या भाईंदर येथील घरातून ताब्यात घेऊन फॉरेन्सिक विभागाकडे पाठवून दिला आहे.

मृतदेहाचे तुकडे खाडीत फेकल्याची कबुली
ठाणे ग्रामीण पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकर याने महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे यांची भाईंदर येथील घरामध्ये हत्या केल्याचे, तसेच वुडकटरच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे करून ते एका पेटीतून भाईंदरच्या खाडीमध्ये टाकून दिल्याची कबुली कुरुंदकर याचा मित्र महेश फळणीकर याने दिली आहे. पोलिसांनी अभय कुरुंदकर याच्यासह त्याला या कामात मदत करणार्‍या त्याच्या साथादारांवर हत्या तसेच पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.