रावेत । येथील पुलाजवळील पवना नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना सोमवारी चारच्या सुमारास उघडकीस आली. मृताची ओळख पटली असून, त्याच्या मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. दिनेश भीमराव पाटील (वय 30, रा. चिखली), असे मयत तरुणाचे नाव आहे.
नागरिकांनी नदीपात्रात मृतदेह दिसत आहे, अशी खबर देहूरोड पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच तातडीने पोलीस तेथे दाखल झाले. पोलिसांनी तो मृतदेह बोटीच्या सहाय्याने बाहेर काढला. पाच दिवसांपूर्वी संबंधित इसम बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी नातेवाईकांना बोलावले असता त्याची ओळख पटली. प्राथमिक माहितीनुसार तो मनोरुग्ण असल्याचे समोर येत आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण काय व हा अपघात होता की हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.