मृतदेह काढायला गेले अन पुतळा घेऊन आले

0

मुंबई – कांदिवलीतील चारकोप नाल्यात मृतदेह तरंगत असल्याचे दिसताच परिसरात भयभीत वातावरण निर्माण झाले, बघता बघता त्या नाल्यावर गर्दी जमली, उत्सूकता ताणली गेली. काही जणांनी तातडीने पोलिसांना बोलावून घेतले, पोलिसांनीही लागलीच मृतदेह बाहेर काढण्याची तयारी सुरू केली. प्रत्यक्ष मोहीम सुरू झाली, अथक परिश्रमानंतर पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढला, तेव्हा पोलिसांची फसगत झाल्याचे उघड झाले, कारण मृतदेह समजून पोलिसांनी जे बाहेर काढले, ते चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेला मानवी पुतळा निघाला.

चिकूवाडीतील एका नाल्यात सापडलेल्या पुतळ्यामुळे स्थानिक रहिवाशांसह चिकूवाडीतील एका नाल्यात मृतदेहासारखे काहीतरी दिसत असल्याचा कॉल आज सकाळी चारकोप पोलिसांना मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातून प्राप्त झाला होता. काही दिवसांपूर्वीच गोराई येथे एका तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पुन्हा अन्य एक मृतदेह पडल्याची माहिती प्राप्त होताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. काही वेळाने तिथे अग्निशमन दलाचे जवानही आले. या जवानांनी नाल्यातून काढलेला मृतदेह नव्हता तर एक पुतळा होता. या नाल्यात कोणीतरी हा पुतळा टाकला होता. पाणी नसल्याने तो खाली होता, मात्र नाल्यातील भरतीमुळे हा पुतळा पाण्याबाहेर आला. हा प्रकार संशयास्पद वाटताच स्थानिक रहिवाशांनी मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली होती. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलीस तपासात काही दिवसांपूर्वी या परिसरात गुन्हे मालिकेसाठी दोन पुतळे आणण्यात आले होते. त्यात एका पुतळ्याला नाल्यात टाकण्यात आले होते तर दुसर्‍या दिवशी दुसरा पुतळा नाल्यातून बाहेर काढण्यात आल्याचे चित्रीकरण करण्यात होते. शूटींग झाल्यानंतर एक पुतळा ते घेऊन गेले तर दुसरा पुतळा नाल्यातच टाकून ते लोक निघून गेले होते. या प्रकार उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांसह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता.