देहूरोड : देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेलारवडाजवळ घोरावडेश्वर डोंगरावर गुरुवारी सायंकाळी तरुणी मृतावस्थेत आढळली होती. या मृतदेहाची अवघ्या काही तासांत ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. काळेवाडी येथे राहणार्या तिच्या मातापित्यांनी शुक्रवारी पोलिस ठाण्यात येऊन मुलीबाबत माहिती दिली. दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कांचन मधुकर शिंदे (वय 19, सध्या रा. आंबेठान चौक, चाकण) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
अशी पटली ओळख
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संबंधित तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. मृतदेहापासून काही अंतरावर पोलिसांना एक प्लास्टीक पिशवी सापडली होती. त्यात एक साडी, ब्लाऊज आणि स्कार्फ अशा वस्तू होत्या. पिशवीवर आंबेठान चौकातील टेलरच्या दुकानाचे नाव व संपर्क क्रमांक होता. तसेच मृतदेहाजवळ तळेगाव-पिंपरी रेल्वे प्रवासाचे तिकीट मिळालेे होते. त्यावरून पोलिसांनी संबंधित टेलरशी संपर्क साधत तरुणीची ओळख पटविली. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे तिच्या पालकांचाही शोध लागू शकला.
आता गुन्हेगारही गवसणार
संबंधित तरूणी ही मूळ गातेगाव, ता.जि. लातूर येथील असून ती शिक्षणासाठी भावासह काळेवाडी येथे आपल्या विवाहित बहिणीकडे राहत असल्याचे समजते. दरम्यान, वर्षभरापुर्वी नोकरी धंद्याच्या निमित्ताने तिचे मातापिताही या ठिकाणी राहण्यास आले असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही तरूणी आपल्या मित्रासोबत चाकण येथे राहत होती, असे तिच्या पालकांनी सांगितले. दरम्यान, संबंधित तरूणीचा खून 17 तारखेला झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. तीन दिवस भर उन्हात पडुन राहिल्यामुळे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. मात्र, तिचा खून कोणी व कुठल्या कारणास्तव केला याबाबत अद्याप समजू शकले नाही. देहूरोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अक्षय शिंदे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
कांचन अभ्यासात हुशार होती
मुळची लातूर येथील गातेगावची असलेली कांचन ही अभ्यासात हुशार होती, अशी माहिती तिच्या पालकांनी दिली. गावी शिक्षण घेत असताना बारावीला तिने 91 टक्के गुण मिळवले होते. गुणांच्या टक्केवारीमुळे तिला पुण्यातील नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला होता. विज्ञान शाखेत पहिल्या वर्षात शिकत असताना काही महिन्यांपुर्वी तिचे शिक्षण थांबविण्यात आले होते, अशी माहिती पुढे आली आहे.