मृत्यूदंडामुळे जाधव कुटुंबीयांना धक्का, अज्ञातस्थळी रवाना

0

मुंबई : पाकिस्तानमध्ये गुप्तहेरी केल्याप्रकरणी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईत राहत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पवई येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे त्यांचे कुटुंबीय सध्या अज्ञात स्थळी गेले आहेत. भारतीय विदेश मंत्रालयाप्रमाणेच जाधव यांच्या कुटुंबीयांनाही जाधव यांच्यावर एखादा खटला सुरू असेल याची माहितीच नव्हती, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झाले आहे. पाकिस्तान जाधव यांचे हाल सरबजीत सारखेच करणार असल्याचा संशय त्यांच्या मित्रांना होता, असेही त्या वृत्तात म्हटले आहे.

कुलभूषण जाधव यांची पत्नी, त्यांची आई, मुलगा शुभांकर आणि मुलगी भैरवी रविवारी सुट्टीसाठी पुण्यावरून मुंबईला आले होते. ते येथील हिरानंदानी गार्डन्समध्ये सिल्वर ओक अपार्टमेंटमध्ये उतरले होते. हा फ्लॅट जाधव कुटुंबीयांचा आहे. जाधव यांच वडील सुधीर जाधव आणि त्यांचे काका सुभाष जाधव मुंबई पोलिसांत सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचे वडील सांगलीत राहतात.

कुलभूषण यांना मार्च 2016 मध्ये पाकिस्तानमधून अटक केल्यानंतर त्यांच्या बालपणीच्या मित्रांनी कुलभूषण यांना परत आणा, हे अभियानही चालवले होते. याबाबत माहिती देताना कुलभूषण यांचे मित्र तुलसीदारस पवार म्हणाले की, मला माहीत होते की पाकिस्तान कुलभूषण यांचे हालही सरबजीत सारखेच करणार. तो खूप मेहनती होता. नौदलमध्ये रूजू केल्यानंतर तो खूप आनंदी होता. नौदल सोडल्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू करणार असल्याचे सांगितले होते. तो व्यवसायच करता होता. मला नाही वाटत ते रॉ मध्ये असतील, असे मतही त्यांनी मांडले.

कुलभूषण यांचे मित्र आणि त्यांच्या नातेवाईकांना घरात येऊ दिले जात नसल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर जाधव कुटुंबीयांच्या एका मित्राने दिली. अपार्टमेंटच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अद्यापपर्यंत सरकारकडून जाधव कुटुंबीयांशी अधिकृतरित्या संवाद साधण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले.