सटाणा (नाशिक) : सैराट चित्रपट कुणाला म माहीत नाही असे नाही. आंतरजातीय विवाह पद्धत हा या चित्रपटाचा विषय होता. जो प्रेक्षकांना विचार करायला लावणारा ठरला. समाजात आंतरजातीय विवाहाला परवानगी नसल्याने अनेक असे विवाह करणार्यांना समाजाचा सामाना करावा लागतो. अशी अनेक उदाहरणे आपण रोज पाहतो. आंतरजातीय प्रेमसंबंधामुळे मुलीच्या बापाने, भावाने मुलीचा अथवा मुलाचा खून करण्यापर्यंत मजल गेलेल्याच्या अनेक संतापजनक प्रकार घडतात. परंतु, माशिक येथे सटाणामध्ये एका युवकाने समाजाला झुगारून आणि विशेष म्हणजे आपल्या प्रेयसीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून तिच्याशी संसार थाटला. हा असा विवाह करून तो आपल्या जुन्या, बुरसटलेल्या विचारांनी बरबटलेल्या समाजासाठी आणि तरुण वर्गासाठी एक आदर्श उदाहरण ठरला आहे.
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे सागर आणि कुमूदिना यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडलेल्या या आंतरजातीय विवाहाला सागरचे कोणतेही नातेवाईक उपस्थित नसले तरी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बशीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर, पीएसआय कृष्णा घायवट व सटाणा पोलीस ठाण्याचे जवळपास सर्व पोलीस कर्मचारी,महिला पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह उपस्थित होते.तासभर चाललेल्या वरातीत सर्व पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी सागरचा आनंद वाढवण्यासाठी नाचले. कुटुंबातील एकही सदस्य लग्नाला उपस्थित नसल्याची जाणीवही कदाचित सागरला होऊ नये यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचार्याने आपली जबाबदारी निभावली. नवरदेवाचा मामा म्हणून जेष्ठ पोलीस कर्मचार्याला उभे करण्यापासून नवरदेवाच्या खांद्यावर अक्षदा टाकण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी पाहून खर्या प्रेमाचा विजय झाल्याचे अविस्मरणीय दृश्ये पाहायला मिळाली. सटाणा पोलिसांनी जातीपातीमधील तेढ दूर करण्यासाठी आणि महाराष्ट्राला पुरोगामी बनविण्यासाठी सटाणा पोलिसांनी घेतलेली भूमिका खरोखर अभिनंदनीय आहे.
एक सच्चा प्रेमवीर
आठ दहा वर्षांपूर्वी ते दोन्ही प्रेमात पडले. आपल्या करिअरकडे दुर्लक्ष न करता अभ्यासही करत राहिले. कालांतराने ती जिल्हा परिषद शिक्षिका झाली आणि तो महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस. दोन्ही सरकारी नोकरीला लागल्याने दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र ती भिल्ल समाजाची आणि तो तेली समाजाचा असल्याने दोन्ही कुटुंबांकडून त्यांच्या विवाहास कडाडून विरोध झाला. प्रेमात अखंड बुडालेल्या या प्रेमीयुगुलाने सर्व विरोध झुगारून एकत्र राहण्याचा ठाम निर्णय घेतला. मात्र दोघांसमोर आभाळाएवढे संकट आले. जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, जिच्याशी लग्न करायचे स्वप्न बघितले तिलाच फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे त्याला समजले. परंतू, तो खचला नाही तर ती या आजारातून बरी व्हावी म्हणून अखेरपर्यंत लढत राहिला. अखेर डॉक्टरांनी केलेल्या योग्य उपचारामुळे तिचा आजार 100 टक्के बरा झाला. आणि पुन्हा लग्नाचा विषय पुढे आला.सुरुवातीला प्रचंड विरोध करणार्या तिच्या घरच्यांनी नंतर त्याने तिला संकटकाळात दिलेली साथ पाहून लग्नाला होकार दिला. मात्र त्याच्या कुटुंबियांचा या लग्नाला स्पष्ट नकार राहिला.
पोलिसांनी पार पाडली पालकांची भूमिका
आपल्या निर्णयावर ठाम असलेला सटाणा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल सागर चौधरी आणि नवापूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेली कुमुदिनी वसावे यांनी सात फेरे घेण्याचा निर्णय घेतला. सटाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्यांना सागरने आपली प्रेमकथा सांगितली आणि अधिकार्यांसह सर्व पोलिसांनी पुढाकार घेत सागरच्या लग्नाची तयारी सुरु केली. जातीपातीत तेढ निर्माण करू पाहणार्या पुरोगामी महाराष्ट्रातील कुटुंबांना धडा शिकविण्यासाठी सटाणा पोलिसांनी एकत्र येण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. शेवटपर्यंत विनवणी करूनही जातीपातीच्या बंधनात बुडालेल्या सागरच्या कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्याने सर्व पोलीस कर्मचार्यांचे कुटुंब आपले कुटुंब मानत 21 मे रोजी थाटात लग्न करण्याचा निर्णय सागरने घेतला. आणि पोलीस वसाहतीत सागरच्या लग्नाची तयारी सुरू झाली.