पिंपरी-चिंचवड : काळेवाडी येथे तुंबलेली मलनिस्सारण वाहिनी साफ करताना श्वास गुदमरल्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी सफाई कामगाराच्या कुटुंबीयांना मदत करावी, असा आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिला आहे. तसेच कामगारांना सुरक्षा न देणार्या कंत्राटदारावर कारवाई करावी आणि कारवाईचा अहवाल सफाई आयोगाला पाठवावा, अशी सूचनादेखील केली आहे.
दोन कामगारांचा झाला मृत्यू
काळेवाडी येथे मलनिस्सारण वाहिनी साफ करताना श्वास गुदमरल्याने कंत्राटी सफाई कामगार भारत भीमराव डावखरे (वय 43, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) या कामगाराचा मृत्यू झाला होता. दोन महिन्यांपूर्वी नाला सफाई करताना बाळू भगवान सोनवणे या सफाई कर्मचार्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या कामगारांना मदत करण्यास महापालिका टाळाटाळ करत आहे. याकडे आरोग्य विभागाचे तक्रार निवारण समितीने आयोगाचे अध्यक्ष रामू पवार यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले होते.
कायद्याचेही उल्लंघन
न्यायालयाच्या आदेशानुसार साफसफाई करताना मृत्यू झालेल्या संबंधित कर्मचार्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये आर्थिक मदत देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याचीदेखील अंमलबजावणी होत नाही. वारंवार घडणार्या घटनांमुळे कंत्राटदार कर्मचार्यांना देत असणार्या सुरेक्षवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच 2013 सफाई कामगार व त्यांचा पुनर्वसन कायदा आणि पीसीआर कायदा 1995 याचे उल्लंघन वारंवार होत आहे, अशी तक्रार सफाई कर्मचारी आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेऊन राज्य सफाई कर्मचारी आयोगाने महापालिकेला सूचना केल्या आहेत.