भुसावळ : कोरोनाच्या अॅक्टीव्ह केस नियंत्रणात आणण्यावर प्रशासनाचा भर असून यापुढे अॅन्टीजन कीटचा वापर करून टेस्ट करण्यात येतील शिवाय भुसावळात रुग्णांची संख्या वाढत असलीतरी लवकरच रुग्ण डिटेक्ट होत असून त्यांना कोरोनातून बाहेर काढण्यासह मृत्यू दर नियंत्रणात आणण्याला आता प्राधान्य राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथे दिली. कोरोनाबाबत आढावा घेण्यासाठी सोमवारी त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्यांची बैठक घेतली.
आढावा बैठकीला यांची उपस्थिती
प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पालिकेच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, ट्रामा सेंटरचे डॉ.देवर्षी घोषाल, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे रामकृष्ण कुंभार आदींसह अधिकारी उपस्थित होते.
ऑक्सीजन बेडची संख्या वाढवण्याच्या सूचना
आढावा बैठकीत जिल्हाधिकार्यांनी उपस्थित अधिकार्यांकडून आढावा घेतला. अॅक्टीव्ह रुग्ण, बेडची संख्या आदींबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी ऑक्सीजनची सुविधा असलेल्या बेडची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक वॉर्डात नागरीकांची आरोग्य तपासणी करावी तसेच स्वॅब घेवून बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. तहसीलमधील गोदामात ठेवलेल्या ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशनीची जिल्हाधिकार्यांनी माहिती जाणली.