जळगाव। पळासखेडे येथील एका महिलेची जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर मृत बाळ जन्माला आले होते. मात्र, महिलेच्या सासूने अर्भकाला कचरा कुंडीत फेकल्यानंतर ते एका भटक्या कुत्र्याने उचलून भरवस्तीत आणून टाकल्याचा प्रकार बुधवारी घडला होता.
याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी मृत अर्भक टाकल्याप्रकरीण बाळाला जन्म देणार महिला, पती, सासू, जेठ, तसेच प्रसुतितज्ञ महिला डॉक्टराचे जबाब घेतले असून मृत अर्भकावर जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून ते अर्भक साखळे कुटूंबियांना सोपविण्यात आले.
कुत्र्यांनी अर्भक आणले भरवस्तीत
सोयगाव तालुक्यातील पळासखेडे येथील गीताबाई तुकाराम साखळे (वय-30) ही महिला मंगळवार संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. बुधवारी पहाटे 1.50 वाजेच्या सुमारास या महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र बाळ हे मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर गीताबाई यांच्या सासू यशोदाबाई किसन साखळे ह्या देखील रूग्णालयात असल्याने त्यांना सकाळी 7 वाजता परिचारिकांनी मृत अर्भक सोपविले. मात्र, यापूर्वीही चार बाळ जन्मानंतर मृत झाले असल्याने हे देखील मृत जन्माला आल्याने यशोदाबाई यांनी कंटाळून बाळ रूग्णालयाच्या मागील बाजूच्या भागातील कचराकुंडीत टाकून दिले होते. कुत्र्यांनी अर्भक भरवस्तीत उचलून आणल्याने परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी येवून मृत अर्भक ताब्यात घेवून जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते.
शवविच्छेदनानंतर अर्भक नातेवाईकांना सोपविले
गिताबाई यांच्या सासू यशोदाबाईंनी मृत अर्भक कचराकुंडीत टाकल्याचे समजताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी लागलीच यशोदाबाई यांना चौकशी ताब्यात घेतले. यानंतर यशादाबाई यांनी बुधवारी दुपारी राठोड यांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानुसार त्यांनी यशोदाबाई यांचे बुधवारीच जबाब नोंदवून घेतले. त्यानंतर आज गुरूवारी पो.उपनिरीक्षक राठोड यांनी मृत अर्भक प्रकरणी गिताबाई, तसेच त्यांचे पती तुकाराम, जेठ, व जिल्हा रूग्णालयाच्या प्रसुतितज्ञ डॉ. निता भोळे या चार जणांना बोलवून त्यांचे जाब-जबाब घेण्यात आले. तर यानंतर मृत अर्भकावर शवविच्छेदन करून ते साखळे कुटूंबियांना सोपविण्यात आले. यातच याप्रकरणाच्या तपासाअंती दोषी ठरल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी दिली.
अन्यथा बायोवेस्टेज विभागात पाठविले जाते
महिलेच्या प्रसुतिनंतर मृत बाळ जन्माला आल्यानंतर जिल्हा रूग्णालयात बाळाचे वजन केले जाते. त्यात जर मृत बाळाचे 1 किलोच्यावर वजन असेल तर त्याला महिलेच्या कुटूंबियांना सोपविले जाते. मात्र, जर मृत बाळाचे वजन 400 ते 500 ग्रँम असल्यास त्यास बायोवेस्टेज या विभागात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयातील प्रसुति विभागाती वैद्यकीय अधिकार्यांनी माहिती दिली. त्यामुळेच बुधवारी गिताबाई यांनी जन्म दिलेल्या मृत बाळाचे वजन हे 1 किलोच्यावर असल्यामुळे ते त्यांच्या कुटूंबियांना सोविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.