बोर्डाकडून मृत जनावरांची हेळसांड
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट विभागाकडे जनावरांसाठी स्वतंत्र विभागच नसल्यामुळे पाळीव प्राण्यांच्या नोंदी, त्यांच्यावरील उपचार, भटक्या जनावरांवरील नियंत्रण आणि मृत जनावरांची योग्य विल्हेवाट लवण्यात अनेक समस्या निर्माण होत आहेत. आज शहरातील पोर्टरचाळजवळ मृतावस्थेत आढळलेल्या गायीची वाहतूक करताना हा प्रकार पुन्हा एकदा अधोरेखीत झाला. अत्यंत निर्दयीपणे स्वयंचलीत कचरागाडीच्या मागे मृत गायीला बांधून लटकलेल्या अवस्थेत निगडी येथे कचरा डेपोत नेण्यात आले. तेथे या गायीचे काय केले हे सांगायला मात्र, कुणीही तयार नाही. देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील रेल्वे पॉवरहाऊस जवळ एका गायीचा दोन दिवसांपुर्वी मृत्यु झाला होता. तिला दोरीने बांधुन अत्यंत निर्दयीपणे कचरा वाहतुकीच्या स्वयंलीत गाडीला लटकवून कचरा डेपोत नेण्यात आले. कचर्याच्या ढिगार्यात तिला टाकुन देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, तिला खड्डयात टाकण्यात आल्याचे संबंधित कर्मचार्यांनी सांगितले. बोर्डाकडे जेसीबी यंत्र नसल्यामुळे हा सर्व प्रकार झाल्याचे कर्मचारी सांगत आहेत. पण मृत गायीला उघड्यावर का टाकण्यात आले, निर्दयीपणे वाहतुक का करण्यात आली, आदी प्रश्नांबाबत उत्तरे मिळु शकली नाहीत.
प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारावी
या संदर्भात आरोग्य विभागाच्या एका अधिकार्याने सांगितले की, ही गाय मृतावस्थेत पडली असून परिसरात दुर्गंधी पसरली असल्याची माहिती रेल्वेच्या स्टेशन मास्तरांकडून आरोग्य विभागाला कळविण्यात आली होती. त्यामुळे अरोग्य विभागाचा कॉम्पॅक्टरने ही गाय उचलण्यात आली. गाडीच्या आत टाकण्याची यंत्रणा नसल्यामुळे चक्क या गाडीच्या मागील बाजुस असलेल्या पाईपला दोरीच्या साह्याने बांधुन अत्यंत निर्दयीपणे या गायीची वाहतूक करण्यात आली. गायीचा मृत्यु नेमका कशामुळे झाला, असे विचारले असता, तिला विषबाधा किंवा सर्पदंश झाला असावा, असे कारण सांगण्यात आले. मात्र, मृत गायीचे शवविच्छेदन केले का, याबाबत मात्र उत्तर मिळू शकले नाही. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे प्राण्यांची नोंद करण्याची सोय नाही. भटक्या जनावरांची नोंद नाही. किंबहुना एखादे भटके जनावर मृत्युमुखी पडल्यास त्याचे शवविच्छेदन आणि योग्य विल्हेवाट लावण्याची सुविधा नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मिकी कोचर यांनी दिली. प्राण्यांसाठी बोर्डाने उपलब्ध सरकारी जागेवर स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी कोचर आणि अॅन्थोनी स्वामी यांनी केली आहे.