मृत पूजा सकटच्या वडीलांवर गुन्हा

0

ग्रामस्थांना शिवीगाळ केल्याचा आरोप, नगररोडवर ग्रामस्थांचा रास्ता रोको
कोरेगाव भीमा येथील संशयास्पद मृत्यूप्रकरण

सणसवाडी : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील 1 जानेवारीच्या दंगलीत घर जाळण्यात आलेल्या घटनेची साक्षीदार असलेली पूजा सुरेश सकट हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने काही दिवसांपासून येथे तणाव निर्माण झाला होता. तो तणाव निवळताच मयत पूजा सकटच्या वडिलांनी शिवीगाळ केली, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून त्याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको करत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले. दरम्यान, शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे मयत पूजा सकटच्या वडिलांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सकट यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप
कोरगाव भिमा ता. शिरूर येथे पूजा सुरेश सकट हिचा विहिरीत मृतदेह सापडला होता. या घटनेनंतर कोरेगाव भिमा दंगलीच्या घटनेला वेगळे वळण लागले. पूजाच्या आत्महत्येप्रकरणी 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर सकट कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात आले. बुधवारी सकाळी सणसवाडीच्या माजी सरपंच आशा दरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव, रामभाऊ दरेकर यांसह इतर चार ते पाच इसम सणसवाडी चौकात थांबले असताना त्यावेळी मयत पूजाचे वडील सुरेश सकट हे संरक्षणासाठी असलेल्या सुरक्षारक्षक पोलिसासह एका दुचाकीवरून चौकात आले. यावेळी आशा दरेकर यांना माझ्या मुलीने आत्महत्या केली त्या गुन्ह्यामध्ये तुझ्या नवर्‍याचे नाव कसे टाकले. येथून पुढे तुम्ही सावध रहा. एक-एकाला फाडून तुमचे कुटुंब संपवून टाकतो. माझे घर जाळले त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तुझ्या नवर्‍याचे व इतर लोकांची खोटी नावे टाकली आहेत, असे म्हणून शिवीगाळ केली.

ग्रामस्थानी सर्व व्यवहार बंद पाडले
हा वाद सुरू असताना तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव यांनी सकट यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता न जुमानता त्यांनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनतर माजी सरपंच आशा दरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव, नामदेव दरेकर, माजी उपसरपंच शिवाजी दरेकर, युवराज दरेकर, नवनाथ हरगुडे, रामदास दरेकर, अ‍ॅड. विजयराज दरेकर, बाबासाहेब दरेकर, रमन दरेकर, नवनाथ दरेकर, गणेश सातपुते यांच्यासह सणसवाडी येथील संतप्त ग्रामस्थांनी सणसवाडी चौकात पुणे-नगर रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको करत सकट यास अटक करून पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन निषेध व्यक्त केला. यानंतर आशा सोमनाथ दरेकर रा. सणसवाडी ता. शिरूर यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी सुरेश सकट यांचेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.