गोंदिया : एका बालकाचा सर्प दंशाने मृत्यू झाला . त्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुर्वेदिक डॉक्टरांना गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. यामुळे घोटी येथील नागरिकांमध्ये रोष असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांना त्वरीत सोडण्यात यावे, या मागणीसाठी नागरिकांनी आज गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला व गोंदिया कोहमारा मार्गावर चक्काजाम आंदोलन केले.
आदित्य गौतम असे या आठ वर्षीय बालकाचा नाव आहे. डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. दरम्यान बालघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. यासाठी बालाघाटावरुन ते आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत गोरेगाव येथे सोमवारी रात्री उशीरा पोहोचले. मात्र एकदा मृत्यू झालेला व्यक्ती परत जिवंत होत नसून हा अंधश्रध्दा निर्माण करणारा प्रकार आहे. त्यामुळे गोरेगाव पोलिसांनी डॉ. लिल्हारे व दोन जणांना सोमवारी रात्री ताब्यात घेतले.
पोलिसांनी डॉ.लिल्हारे यांना घोटी येथे पोहोचू दिले नाही, त्यामुळे बालकाचे प्राण वाचविता आले नाही असा आरोप करीत घोटी येथील नागरिकांनी आज गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.