मृद व जलसंधारण आयुक्तालय स्थापनेचा शासन निर्णय जारी

0

मुंबई – औरंगाबाद येथे मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेचा निर्णय शासनाने बुधवारी जारी केला असून मृद व जलसंधारण आयुक्तालयांतर्गत आस्थापनेकरिता एकूण 16 हजार 479 पदांच्या आकृतिबंधास मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार औरंगाबाद येथील जल व भूमि व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) स्वायत्ततेला बाधा न आणता या संस्थेस मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित आणण्यात आले असून वाल्मीच्या परिसरातच हे आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहे. आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी 187 पदांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

मृद व जलसंधारण विभागांतर्गत स्वतंत्र मृदसंधारण यंत्रणा मंजूर करण्यात आली असून त्याकरिता कृषी विभागातील 9967 पदे तर जलसंपदा विभागाकडून 3376 पदे कार्यरत अधिकारी कर्मचा-यांसह वर्ग करण्यास या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. या विभागात येऊ इच्छिणाऱ्या कृषी व जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून 15 जुलै 2017 पर्यंत विहित नमुन्यात विकल्प घेऊन मृद व जलसंधारण विभागात वर्ग करण्यात येणार आहेत. याशिवाय आयुक्तालयासाठी 16 पदे नव्याने निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या आस्थापनेवर आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांच्या अधिपत्याखाली जलसंधारण व मृदसंधारण या दोन स्वतंत्र यंत्रणा मंजूर करण्यात आलेल्या असून यांचा आकृतीबंध व पदांची संख्या यांचा संरचनात्मक तक्ता प्रसिद्ध करण्यात आला आहे.या निर्णयानुसार जलसंपदा व षी विभागातील जे अधिकारी, कर्मचारी मृद व जलसंधारण विभागाकडे कायमस्वरुपी वर्ग होण्याचा विकल्प देवू इच्छित आहेत; त्यांनी विहीत नमुन्यातील विकल्प कार्यालय प्रमुख व प्रशासकीय विभागामार्फत मृद व जलसंधारण विभागाकडे पाठवायचे असून आगाऊ प्रत a.chandanshive@nic.in या ई-मेलवर दि. 15 जुलै, 2017 पर्यंत पाठवावी. विकल्पाची प्रत व्यक्तिश: देऊ इच्छिणारे व्यक्तीश: अथवा पोस्टाद्वारे अं. सा. चंदनशिवे, अवर सचिव (जल-2), 5 वा मजला, पश्चिम ब्रीज, मंत्रालय (विस्तार इमारत), मंत्रालय, मुंबई – 32. फोन नं. (2202 2526) या पत्त्यावरही विकल्प पाठवू शकतात, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.