ओटावा। फास्ट फूड कंपनी मॅक्डोनाल्डने चुकून हाकललेल्या एका आजीबाईंनी एक लाख कॅनेडियन डॉलरची (74,390 अमेरिकी डॉलर) भरपाई मिळवली आहे.
एस्थर ब्रेक नावाची ही 66 वर्षांची महिला मॅक्डोनाल्डच्या विविध उपाहारगृहांत 1986 पासून काम करत आहे. ओटावातील एक कसेबसे चालणारे उपाहारगृह चालवण्यास त्यांना 2012 साली सांगण्यात आले होते. त्यात अपयशी ठरल्यावर पदावनती स्वीकारा किंवा हकालपट्टी करण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या कामाबाबत त्यांना सदैव उत्तम शेरे मिळाले होते. त्यांनी पदावनतीला नकार दिला आणि म्हणून नोटीस न देता किंवा पैसे न देता त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यावर त्यांनी चुकीच्या बरखास्तीबद्दल मॅक्डोनाल्डवर खटला भरला. त्यात त्यांनी पहिल्यांदा खटला जिंकला आणि न्यायालयाने त्यांना एक लाख पाच हजार कॅनेडियन डॉलरची भरपाई देण्याचा आदेश दिला. यावर उपाहारगृहाच्या मालकाने वरच्या न्यायालयात दाद मागितली. मात्र, ओंटारियो अपील कोर्टाने या आठवड्यात मूळ आदेश कायम ठेवला. अशा प्रकारच्या अनेक घटना घडतात. परंतु, हा खटला न्यायालयापर्यंत पोहोचला याचेच आश्चर्य वाटत असल्याचे एस्थर यांच्या वकील मिरियम व्हेल पीटर्स म्हणाल्या.