मॅक्सिको : मॅक्सिकोत एका तेलाच्या वाहिनीला आग लागून झालेल्या स्फोटात ७३ जणांचा मृत्यू झाला तर ७४ नागरिक जखमी झाले आहेत. हिडाल्गो राज्यातील तलाहुलिलपान या शहरातील काही चोरांनी तेल चोरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे स्थानिकांनी म्हंटले आहे. तेल वाहिनी फोडल्यानंतर ही आग लागली होती. आग लागल्यानंतरही काहीजण रस्त्यावर सांडलेले तेल उचलत होतो. हिडाल्गोचे गर्व्हनर यांनी सांगितले आहे की, स्फोट झाल्यानंतर ही आग अजून भडकली. या घटनेनंतर मॅक्सिकोचे राष्ट्रपती एंड्रेस मॅन्युअल लोपेज यांनी इंधन चोरीवर आळा घालण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान या आगेवर नियंत्रण मिळवण्यात आले असून पोलिसांनी पुढील कारवाईस सुरू केली आहे.
तेल चोरीचे प्रमाण वाढले
मॅक्सिकोमध्ये मागील काही महिन्यांपासून तेल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मॅक्सिको सरकारने दिलेल्या माहितीनुसार तेल चोरीमुळे आतापर्यंत २१० अब्ज रुपयांचे नुकसान झाले. डिसेंबर महिन्यात तेल चोरीला आळा घालण्यासाठी एक नवी मोहीम राबवण्यात आली होती. या घटनेची चौकशी करणाऱ्या कंपनीने अहवाल दिला आहे. या अहवालानुसार तेल वाहिनीला छिद्र पाडून तेल चोरी केले जात होते. वाहिनीला पाडलेले छिद्र उघडे राहिल्यामुळे ही घटना घडली असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.