पुणे । देश – विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईमध्ये दि. 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान मॅग्नेटिक महाराष्ट्र हे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक प्रदर्शन होत आहे.यामध्ये पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सहभागी होणार आहे. या ठिकाणी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्राधिकरण विशेष दालन उभारणार आहे.अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
खाजगी गुंतवणुकदारांना आकर्षीत करणार
पीएमआरडीएने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगतच्या भागांतही विविध सुविधा निर्माण करण्यासाठी मेट्रो, रिंगरोड, टीपी स्कीम यासारखे् मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. या सर्व प्रकल्पामधील गुंतवणुकीचे फायदे या परिषदेला भेट देणार्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. या सर्व प्रकल्पांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक जागा उपलब्ध होणार असून तेथे गुंतवणूक करण्यासाठी, कार्यालयांसाठी विविध कंपन्यांना आकर्षित करून घेण्याचे उद्दिष्ट आहे.
पीएमआरडीएच्या हद्दीत टीपी स्कीमच्या माध्यमातून 128 किमीचा रिंगरोड करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. पीएमआरडीएने म्हाळुंगे येथील पहिल्या टीपी स्कीमची सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्याचा प्रारूप आराखडा लवकरच जाहीर केला जाणार आहे. तसेच, हिंजवडी आयटी पार्कलगत असणार्या म्हाळुंगे टीपी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासह हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान होणार्या मेट्रो प्रकल्पाची माहिती सर्वांना दिली जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) राबविण्यात येणार असल्याने तेथे खासगी उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधीबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.