मॅग्नेटिक महाराष्ट्रांतर्गत पुण्यात मोठी गुंतवणूक; १० हजारांपेक्षा अधिक रोजगार

0

पुणे : ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या दुसऱ्या पर्वात पुणे व आजूबाजूच्या परिसरात सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यातून पुण्यात १० हजारांपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहेत.

या उद्योगांना स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणींबाबत आगामी काळात आढावा घेतला जाईल. या सामंजस्य करारांनुसार दहा हजारांपेक्षा जास्त रोजगार पुण्यात उपलब्ध होणार आहे. तसेच या उद्योगांना पूरक इतर उद्योगांमधूनही मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

या करारांपैकी ग्रेटवॉल मोटर्स या प्रकल्प पुण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून त्यातून रोजगारनिर्मिती, आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरेल. सिंगापूरचा असेंडास समूह पुण्यामध्ये पायाभूत सुविधा व दळणवळण यामध्ये यापूर्वीपासून कार्यरत आहे. तर, चीनच्या ग्रेटवॉल व पीएमआय इलेक्ट्रो या ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपन्या येत आहेत. रांजणगाव येथे इलेट्रॉनिक डिझाइन सिस्टीम ही दक्षिण कोरियाची कंपनी देखील येत आहे. वरुण बिव्हरिजेस कंपनीचा अन्न प्रक्रियाबाबतचा प्रकल्प सुपा येथे होणार असला, तरी पुणे जिल्ह्य़ाला लागून असल्याने त्याचा फायदाही पुण्यालाच मोठय़ा प्रमाणावर होणार आहे.