मुंबई । येत्या 18 ते 23 मार्चपर्यंत वांद्रे-कुर्ला संकुलात राज्य शासनातर्फे होणार्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-2018’ या औद्योगिक, संरक्षण व अन्य क्षेत्रासंबंधी प्रदर्शनात देशविदेशातील कंपन्यांचे उच्च अधिकारी, जागतिक गुंतवणूकदार, तज्ज्ञ व तंत्रज्ञ आणि संबंधित उच्चपदस्थ उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मुंबई महापालिकेचे भव्य विशेष दालन ‘बीकेसी’मध्ये उभारण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी सुरू असून, पालिकेचे 20 अधिकारी-कर्मचारी या वेळी प्रतिनिधित्व करणार आहेत. महापालिकेचा महत्त्वाकांक्षी ‘सागरी किनारा रस्ता’ प्रकल्पाची प्रतिकृती व माहिती तेथे झळकणार आहे. या वेळी जागतिक गुंतवणूकदार उपस्थित राहणार असल्याने त्यांच्याकडून यात गुंतवणूक कशी होईल, त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, याचे सर्वतोपरी प्रयत्न पालिकेतील उच्चपदस्थांकडून सुरू आहेत.
तब्बल 15 हजार कोटींचा उपक्रम!
राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ’तर्फे (एमआयडीसी) आयोजित येत्या दीड महिन्यांंनी ‘बीकेसी’मध्ये होणार्या ’मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. यावेळी औद्योगिक, संरक्षण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, खाद्य प्रक्रिया व अन्य संबंधित क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याची संधी साधून मुंबई पालिका व अन्य संबंधितांची दालने उभारण्यात येणार आहेत. पालिकेनेही गेल्या आठवड्यापासून त्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. तेथे परदेशातील गुंतवणूकदार येणार असल्यामुळे ‘कोस्टल रोड’ विषयी साद्यंत माहिती देणारे भव्य सचित्र दालन उभारण्यात येणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च तब्बल 15 हजार कोटी रुपये असल्यामुळे तो खर्च उभारण्याचे ‘महाशिवधनुष्य’ पेलणे महापालिकेच्या आवाक्याबाहेरचे आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास त्याचा फायदा पालिकेला होणार आहे.