पुणे (प्रतिनिधी) – मुंबईत तीन दिवसांत पार पडलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत विविध मोठ्या कंपन्यांशी एकूण 4106 करार करण्यात आले आहेत. यापैकी 5233 कोटी रूपयांचे 278 करार हे पुण्यातील औद्योगिक वसाहतींशी संबंधित होते. पुणे जिल्ह्यात रांजणगाव आणि चाकण औद्योगिक वसाहतींनी अल्पावधीत चांगला विकास केला आहे. यामुळे या वसाहतींकडे उद्योजक आकर्षित झाले असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
18,425 नोकर्या उपलब्ध होणार
मेक इन इंडियाअंतर्गत मुंबईत 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या परिषदेला मोठ्या संख्येने गुंतवणूकदार, उद्योजक उपस्थित होते. परिषदेत राज्य सरकारने विविध कंपन्यांशी एकूण 4106 करार केले. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी आणि 1 एमआयडीसीचे विभागीय अधिकारी संजीव देशमुख यांनी सांगितले की, या परिषदेंतर्गत झालेल्या करारांमुळे भविष्यात पुणे जिल्ह्यातील एमआयडीसींमधून थेट 18,425 नोकर्या उपलब्ध होणार आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत झालेल्या करारातून विविध प्रकल्पांसाठी 12.10 लाख कोटी इतकी गुंतवणूक होणार असून, यातून महाराष्ट्रात 3.6 दशलक्ष नोकर्या निर्माण होणार आहेत.
व्हरपूल, ब्रिटानिया, अॅडीएन्ट आदी कंपन्या करणार गुंतवणूक
देशमुख म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून अनेक क्षेत्रांतील गुंतवणुकीसाठी पुणे औद्योगिक क्षेत्राला उद्योजक प्राधान्य देत आहेत. आम्ही औद्योगिक क्षेत्रांसाठी ज्या सेवा पुरवित आहोत तसेच भौगोलिकदृष्ट्या अनुकूलता, उपलब्ध पायाभूत सुविधा यामुळे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतही पुणे जिल्ह्यासाठी 278 प्रकल्पांचे करार करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. जिल्ह्यातील या औद्योगिक क्षेत्रांमध्ये चाकण, तळेगाव, रांजणगाव, पिंपरी, बारामती आणि पंदेरे एमआयडीसींचा समावेश आहे. परिषदेत झालेल्या करारांमुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये थेट गुंतवणूक होणार आहे. व्हरपूल, ब्रिटानिया, अॅडीएन्ट इंडिया आणि एम्बासी इंडिया पार्क या पुणे जिल्ह्यात गुंतवणूक करणार्या प्रमुख कंपन्या आहेत.
पंतप्रधानांनीही केले पुणे विभागाचे कौतुक
मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेमुळे पुणे जिल्ह्यासह राज्यात होत असलेल्या थेट गुंतवणुकीमुळे राज्याचे चित्र आणखी पालटणार आहे. तसेच मुंबई-पुणे हायपर लूप प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्याच्या विकासाचा वेग प्रचंड वाढणार आहे, असे देशमुख यांनी म्हटले. मॅग्नटिक महाराष्ट्र परिषदेत पुणे एमआयडीसीने स्टॉल मांडून विभागाचे प्रतिनिधीत्व केले होते. परिषदेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक आमच्या स्टॉलजवळ आले आणि आम्ही आमच्या विभागात गुंतवणूक वाढविण्यासाठी केलेल्या कामाचे त्यांनी कौतूक केले, असे देशमुख यांनी सांगितले.