मॅटिस यांची डोवाल यांच्याशी भेट

0

 वॉशिंग्टन:राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ, संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोन बोल्टन यांच्याशी दोन्ही देशांतील भविष्यातील सामरिक संबंधांवर सविस्तर चर्चा केली. भारत अमेरिकेदरम्यान टू प्लस टू चर्चा झाल्यानंतर उभय देशांतील ही पहिलीच उच्च स्तरावरील चर्चा होती.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच बोल्टन यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नियुक्ती केली. बोल्टन पदावर नियुक्त झाल्यानंतर त्यांची डोवाल यांच्याशी पहिलीच भेट होती. डोवाल आणि पॉम्पिओ यांची गेल्या आठवड्यात नवी दिल्ली येथेही भेट झाली होती. सूत्रांनी सांगितले, की एकापाठोपाठ झालेल्या या उच्च स्तरांवरील बैठकांतून डोवाल यांनी टू प्लस टू चर्चेनंतरच्या अमेरिकेबरोबरील संबंधांचा आढावा घेतला. डोवाल यांच्याबरोबर भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सिंग सरना हेदेखील उपस्थित होते. अत्यंत विस्तृत अशा पातळीवरील ही चर्चा होती. ट्रम्प प्रशासनातील तीन वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही देशांतील भविष्यातील सामरिक संबंधांची दिशा स्पष्ट करण्याविषयी बोलणी केली. तसेच, सहकार्याची क्षेत्रे निश्चित केली. प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही या वेळी चर्चा झाली.