मॅन्चेस्टरमध्ये दहशतवादी हल्ला; 22 ठार, 59 हून अधिक जखमी

0

लंडन । ब्रिटनमधील मँचेस्टर एरिना येथे सोमवारी रात्री पॉप गायक अरियाना ग्रँडच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या दोन स्फोटात सुमारे 22 जण ठार तर 59 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा दहशतवादी असल्याचे सांगण्यात येते. हा आत्मघातकी हल्ला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी अरियाना गाणे सादर करत होती. गायिका अरियाना सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात ठार झालेल्यांप्रती शोक व्यक्त करत डाऊनिंग स्ट्रीटवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यापर्यंत उतरवण्याच्या सूचना करण्यात आली आहे. 10 डाऊनिंग स्ट्रीट हे ब्रिटिश सरकारचे मुख्यालय आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केला असून या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमींसाठी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

एका आत्मघातकी हल्लेखोराचा हात
स्फोटोमागे एका आत्मघातकी हल्लेखोराचा हात असल्याची माहिती ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी दिली. पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासानुसार हल्लेखोर एकटाच होता. मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश असल्याचे पोलिसांचे मत आहे. ग्रेटर मँचेस्टरचे पोलीस प्रमुख इयान हापकिन्स यांनी या हल्ल्यामागे आत्मघातकी हल्लेखोराचा हात असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. हल्लेखोर एकटा होता किंवा यामध्ये एखाद्या मोठ्या नेटवर्कचा समावेश होता. याबाबत पोलीस ठोस स्वरूपात काही सांगू शकत नाहीत. हल्लेखोराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्याकडे आयइडी हे स्फोटके होती. कॉन्सर्टच्या अखेरीस त्याने स्फोट केला.

अरियानाचा मन हेलावणारा मेसेज!
पॉप सिंगर अरियाना ग्रांडे सुरक्षित असली तरी ती कोलमडली आहे. ज्यावेळी स्फोट झाला, तेव्हा अरियानाचा परफॉर्मन्स सुरु होता. आपल्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर दु:खी अरियानाने आज सकाळी (मंगळवार) ट्वीट करुन लोकांची माफी मागितली आहे. अगदीच कोलमडले आहे. मी यासाठी मनापासून माफी मागते, माझ्याकडे शब्द नाहीत, असे ट्वीट तिने केले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतीचे सावट
मॅन्चेस्टरमधील बॉम्ब हल्ल्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतीचं सावट पसरलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया उद्या इंग्लंडकडे रवाना होणार आहे. त्यामुळे या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआयनं तातडीची बैठक बोलावली आहे. येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यादृष्टीने ही बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीसाठी टीम इंडियाचे व्यवस्थापक हजर राहणार असल्याचं समजतं आहे. या हल्ल्यानंतर येथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

प्रियांकाने केले सांत्वन
कलाकारांकडूनसुद्धा या हल्ल्यावर प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अरियाना ग्रॅण्ड तसंच तीचा कॉन्सर्ट बघायला गेलेल्या हजारो लोकांचं सांत्वन केलं आहे. ट्विटरवरून प्रियांका चोप्रा हिनं ही प्रतिक्रिया दिली आहे. ”माझे विचार आणि प्रार्थना अरियाना ग्रॅण्ड व हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांसोबत आहेत. या जगात काय सुरू आहे’?, असं ट्विट प्रियांकाने केलं आहे.

तिकीट विंडोजवळ दोन स्फोट झाले
मॅनचेस्टर एरिनामध्ये तिकीट विंडोजवळ स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजून 35 मिनिटाला हा दोन स्फोट झाले. शो समाप्त झाल्यानंतर लोक बाहेर येत होते. एरिनाजवळ व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशन आहे. त्याचबरोबर नॅशनल फुटबॉल म्यूजियमही आहे. मॅनचेस्टर एरिना हे यूरोपातील सर्वात मोठे इनडोर स्टेडियम आहे. 1995 मध्ये स्टेडियमचे उद्घाटन झाले होते. येथे अनेकदा मोठे कॉन्सर्ट आणि कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात येते. संपूर्ण परिसरात आता नाकाबंदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनवरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एरिना येथे अमेरिकन सिंगर अरियाना ग्रांडेचा म्युझिकल कॉन्सर्ट सुरु असताना भीषण बॉम्बस्फोट झाले. ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा में यांनी या बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.

म्युझिकल कॉन्सर्टला केले होते टार्गेट
दहशतवाद्यांनी अमेरिकन पॉप सिंगर अरियाना ग्रांडेच्या कॉन्सर्टला टार्गेट केले. या कार्यक्रमाला 10,000 लोक उपस्थित होते. त्यात तरुण-तरुणींची संख्या सर्वाधिक होती. सिंगर ग्रांडे सुरक्षित आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याच दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. दुसरीकडे, पंतप्रधान थेरेसा में यानी इलेक्शन कॅम्पेन थांबवून आपातकालीन बैठक बोलावली होती. नरेंद्र मोदी यांनी मॅनचेस्टर येथील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ’ट्वीट’ करून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांबाबत संवेदना प्रकट केल्या आहेत.

ब्रिटन आणि अमेरिकेने भारतासोबत यावे
ब्रिटनमधील मँचेस्टर येथे घडलेल्या हल्ल्याचा आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्‍वास यांनी निषेध केला. ते म्हणाले, ब्रिटन आणि अमेरिकेने भारतासोबत येऊन पाकिस्तानविरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येत्या काळात या तीन देशांनी मिळून एकत्र येऊन पाकिस्तानला धडा शिकवायला हवा. कुमार विश्‍वास यांनी या हल्ल्याविषयी एक ट्विटही केले आहे. या माध्यमातून त्यांनी काव्यात्मक रुपाने आपल्या भावना व्यक्त केल्या. या हल्ल्याबाबत ते म्हणतात, असे लोक कसे असतात जे बाँब बनवतात, यांच्याहून चांगले तर रेशीम बनविणारे किडे असतात.