मॅरेथॉनच्या उद्घाटनाला पार्थ पवार यांची उपस्थिती

0
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केले आयोजन
लोणावळा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेआयोजित करण्यात आलेल्या लोणावळा मॅरेथॉनला अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सकाळी सात वाजताच हजेरी लावली. पार्थ पवार यांची ही उपस्थिती भविष्यातील राजकीय वाटचालीची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मावळ लोकसभेकरिता पार्थ यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. गटा-तटाचे राजकारण होत असल्याने पार्थ पवार यांची उमेदवारी नक्की समजली जात आहे. त्यातच या मॅरेथॉनसाठी त्यांनी उपस्थिती लावली, यावरून त्यांचा भविष्यातील राजकारण प्रवेशाची ही नांदी आहे असे समजायला हरकत नाही.
शहर झाले राष्ट्रवादीमय
पार्थ पवार लोणावळ्यात येणार आल्याने शहरातील सर्व रस्त्यावर पदाधिकार्‍यांनी पक्षाचे झेंडे, स्वागत कमानी व स्वागताचे बोर्ड लावत शहर राष्ट्रवादीमय करण्यात आले होते. पार्थ यांच्या हस्ते भाजी मार्केट चौकात मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक, पालक असे हजारो नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. भाजी मार्केट चौक ते भांगरवाडी, पंडीत नेहरु मार्ग, सिध्दार्थनगर, मावळा पुतळा चौक, जयचंद चौक मार्गे पुन्हा भाजी मार्केट चौक अशी ही मॅरेथॉन झाली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, मावळ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, लोणावळा शहर महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, बाळासाहेब पायगुडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब कडू, नितिन शहा, माजी नगराध्यक्ष अमित गवळी, राजु बोराटी, रवी पोटफोडे, भूषण पाळेकर, सोमनाथ गायकवाड, राजेश मेहता, कुमार धायगुडे, अमोल गायकवाड, मनोज लऊळकर, दत्तात्रय गोसावी, संतोष कचरे, शीला बनकर, वकील सेलचे अध्यक्ष शेलार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.