मॅरेथॉन बैठकीत समस्यांचा महापूर!

0

मुंबई । जिल्ह्यातील विविध समस्यांवर सोमवारी, मंत्रालयात मॅरेथॉन बैठक झाली. हुडको कर्ज, 25 कोटींचा निधी, गाळ्यांचा प्रश्न, शिवाजीनगर उड्डाणपूल, पिंप्राळा पूल, बहिणाबाई स्मारक, महत्वाच्या अधिकार्‍यांच्या नियुक्त्या, नवीन तहसील कार्यालय, आयुक्तांची नेमणूक, मेहरून तलावाच्या विकासाचा प्रस्ताव यांच्यासारख्या शहरातील प्रश्नांसह कृषीविद्यापीठ, लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, मलनि:सारण केंद्र यांसारख्या 16 विषयांवर चर्चा झाली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आयोजित या बैठकीला ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह स्थानिक आमदार, महापौर, जिल्हाधिकारी व महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत खडसे यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी बाजू लावून धरली. यावेळी पाटील यांनी काही मागण्या तात्काळ मान्य केल्या तर काहींचा आढावा घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश परिस्थितीतील सवलती पुढे कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

विद्यापीठासंबंधी प्रस्ताव अद्याप थंड बस्त्यात
राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून स्वरूपाचे विद्यापीठ जळगाव, धुळे,नंदुरबार जिल्ह्यांकरिता निर्माण करण्याबाबत कृषी विद्यापीठाचा अहवाल राज्य सरकारकडे आला आहे. हे विद्यापीठ तीन जिल्ह्यांपैकी नेमके कुठे होणार? हे अद्याप ठरले नसले तरी खान्देशातच होण्याबाबत शासन सकारात्मक आहे. यासाठी एक स्वतंत्र समिती कार्यरत असून समितीच्या शिफारशीनंतरच तीन जिल्ह्यांपैकी विद्यापीठ कुठे करायचे? हे ठरणार आहे. मात्र अद्याप यासबंधात कुठलाही प्रस्ताव आला नसल्याने यावर अधिक चर्चा झाली नसल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले. या बैठकीने चाळीसगाव तालुक्याला झुकते माप दिले.

शहरातल्या समस्यांवर केवळ चर्चाच
जळगाव शहरात सध्या सर्वात चर्चेत असलेला गाळ्यांचा मुद्द्यावर चर्चा होईल अशी शक्यता होती मात्र हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने यावर चर्चा होऊ शकली नाही. हुडको कर्ज प्रकरणी केंद्रात नवीन नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन पाटील यांनी दिले. तसेच डीआरटी कोर्टात चांगला वकील नेमु असेही ते म्हणाले. तसेच शहर विकासाकरिता 25 कोटींचा आमदार निधी खर्चाच्या वादाचाही निपटारा या बैठकीत करण्यात आले असून आमदारांशी चर्चा करून सामंजस्याने निधीतून कामे करा असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. कामे न झाल्यास निधी परत घेऊ अशी तंबीही पाटील यांनी दिली.

कोट्यवधींचा मार्ग मोकळा
बैठकीमध्ये शिवाजीनगर उड्डाणपूल, प्रिंप्राला पूलाच्या कामसंबंधी चर्चा झाली. पिंप्राळा पुलासाठी नगरविकासकडून फंड देण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले तर शिवाजी नगर पुलासाठी 22.40 कोटी पैकी अर्धा खर्च रेल्वेने तर अर्धा शासनाने करण्याबाबतही रेल्वे अधिकार्‍यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. मेहरून तलावाच्या विकासासाठी 33.56 कोटीचा प्रस्ताव नाकारल्यानंतर सुधारित 4.98 कोटींचा प्रस्ताव टाकण्याचे निर्देश पाटील यांनी दिले. तर बहिणाबाईंच्या स्मारकासाठी लागणारा 9.50 कोटींचा निधी दोन टप्प्यात देण्याची मागणी खडसे यांनी केली यावर चंद्रकांत पाटील यांनी 5 करोड रुपये पहिल्या टप्प्यात देण्याच्या सूचना सार्वजनीक बांधकाम विभागाला दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात महत्वाच्या अधिकार्‍यांच्या रिक्त असलेल्या पदाच्या भर्तीवरून सर्वच लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. यावेळी जळगाव मनपाला आयुक्त नेमण्याची मागणी महापौरांनी केली. तर जिल्हा पुरवठा अधिकारी, पुनर्वसन अधिकारी आशा महत्वाच्या अधिकार्‍यांच्या नियुक्त्या होऊनही रुजू न झाल्याने संताप व्यक्त केला. जर जे रुजू झाले नाहीत तर निलंबित करू अशी तंबी चंद्रकांत पाटील यांनी दिली. लिंबूवर्गीय संशोधन केंद्राची जागा चाळीसगाव शहरात घेण्याचे या बैठकीत ठरले आहे. तसेच पाल हर्टीकल्चर कॉलेजसाठी याचबरोबर बनाना टिशू कल्चर संशोधन केंद्र हिंगोना व केळी प्रकिया केंद्रासाठी जागा जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे वर्ग कराव्या अशा सूचना दिल्या आहेत. खडसे यांनी त्यांच्या काळात मंजूर केलेल्या प्रकल्पांना स्थगिती आणि इतरत्र हलविल्याच्या मुद्द्यावरून अधिवेशनात फडणवीस सरकारची लक्तरेच काढली होती. या पार्शवभूमीवर अधिवेशनात तात्काळ बैठक लावली होती. त्या बैठकीत महिन्याला दर बैठक घेऊन आढावा घेतला जाईल असे ठरले होते. त्या पार्शवभूमीवर आज चर्चा झाली.

बैठकीला यांची होती उपस्थिती
महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आयोजित केलेल्या बैठकीला आमदार एकनाथराव खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार स्मिता वाघ, आमदार राजुमामा भोळे, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, माजी आमदार गुरुमुख जगवणी, रमेश जैन, माजी महापौर नितीन लड्ढा, माजी आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासह मनपातील सर्व महत्वाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

मागील बैठकीत ठरलेल्या विषयांवर चर्चा झाली. चंद्रकांत दादांनी निर्देश दिले आहेत. पाठपुरावा करून लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याबाबत त्यांनी अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत.
– एकनाथराव खडसे, आमदार

बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. गोलानी आणि अन्य मार्केटचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर चर्चा झाली नाही. 25 कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन स्थानिक आमदारांसोबत चर्चा करून करण्याचे निर्देश या बैठकीत दिले आहेत.
-राजुमामा भोळे, आमदार