मेंटल क्वॉर्टर्समधील शौचालयाची दुरवस्था

0

येरवडा । येरवडा परिसरातील मेंटल क्वॉर्टर्स परिसरातील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत असून यावर त्वरित उपाययोजना न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे विभाग संघटक सतीश वानोळे यांनी दिला आहे.

औषध फवारणी नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले
येरवडा भागात मनोरुग्णालय असल्याने येथे काम करणार्‍या पदाधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता प्रशानाच्या वतीने क्वॉर्टर्स उभारल्या असून येथील नागरिकांची मुख्य समस्या लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी व शौचालयाचा प्रश्‍न मार्गी लागावा या उद्देशाने शौचालय 1995 उभारण्यात आले असले तरी पण आता त्याची दुरावस्था झाली आहे. शौचालयाचे दरवाजेच तुटलेले असल्यामुळे येथील नागरिकांसह महिलांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत असून रात्रीच्या सुमारास येथे विजेची सुविधा नसल्याने परिसरातील दारुड्यांच्या दहशतीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण रात्रीच्या सुमारास शौचालयाचा वापर दारुडे दारू पिण्यासाठी करत असल्यामुळे परिसरातील महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच मैलापाणी वाहून जाण्यासाठी पालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारे उपाययोजना करण्यात न आल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जाण्याची वेळ येत असून आरोग्य विभागामार्फत परिसरात कोणत्याही प्रमाणात औषध फवारणी करण्यात येत नसल्याने परिसरात डासांच्या प्रमाणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

नवीन शौचालये उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
त्यातच दारूच्या मोकळ्या बाटल्या परिसरात अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिसरातील कर्मचार्‍यांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन असलेले शौचालय हे कमी पडत असल्यामुळे दोन वर्षांपूर्वी नवीन 8 शौचालय बांधण्यात आली असली तरी पण ते अद्याप ही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून ते दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असून परिसरात वेळेवर कचरा उचलण्यासाठी साफसफाई कर्मचारी येत नसल्याने येथील नागरिकांना असणारा कचरा हा नाइलाजास्तव उघड्यावरच टाकण्याची वेळ येत असून संबंधित शौचालयाकडे जाण्यास मार्गच नसल्याने परिसरातील नागरिकांना अनेक समस्येला तोंड देण्याची वेळ येत आहे. ही सोसायटी अनेक समस्यांमध्ये अडकली असून नेत्यांची आश्वासने ही फुसका बार ठरली आहे. यामुळे समस्येच्या विळख्यात अडकलेल्या ह्या परिसराची मुक्तता होणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करत आहे. जर प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर शौचालयाची दुरुस्ती न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वानोळे यांनी दिला आहे.

सर्वसामान्य जनतेच्या करातूनच प्रशासन विविध विकासकामे करत असले तरी पण शौचालयाची झालेल्या दुरवस्थेकडे जर पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर उभारण्यात आलेली शौचालये ही कोणासाठी?
– सतीश वानोळे, विभाग संघटक, मनसे