लोणी भापकर । मेंढपाळांची भटकंती थांबविण्याबरोबरच भटक्या जमाती क’ वर्गातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना कार्यान्वित केली आहे. पात्र लाभार्थ्यांनी बुधवार (दि.15) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा राज्य पशुसंवर्धन समितीचे सदस्य माणिकराव दांगडे-पाटील यांनी केले आहे.
स्थायी मेंढीपालनाकडे वळा
दिवसेंदिवस चराई शिवार घटत आहे. चारा व पाणी टंचाईमुळे मेंढपाळाला वर्षातील जवळपास आठ महिने भटकंती करावी लागते. त्यातून मुलांच्या शिक्षणाची तर कुटुंबाच्या आरोग्याची प्रचंड हेळसांड होते. यासाठी मेंढपाळांनी स्थलांतराबरोबरच स्थायी मेंढीपालनाकडे वळावे व सुधारीत प्रजातीतून मांस, लोकर व दूध दर्जात वाढ करावी या हेतूने महामेष योजना लागू केली आहे, असे दांगडे-पाटील यांनी सांगितले.
मेंढीपालनासाठी शासनाचे अनुदान
महामेष योजनेद्वारे स्थायी मेंढीपालनासाठी 3 लाख 33 हजार तर भटकंती गटासाठी 2 लाख अडीच हजार इतका खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही गटांसाठी 75 टक्के शासन अनुदान मिळणार आहे. प्रत्येक गटात दख्खनी किंवा माडग्याळ आदी सुधारीत जातीचा एक नर मेंढा व 20 मेंढ्या दिल्या जातील. याशिवाय मेंढरांसाठी चारा, पाणी, निवारा, पशुखाद्य अशा बाबींसाठी स्वतंत्र अनुदानाच्या योजना असल्याचे दांगडे-पाटील यांनी सांगितले. या योजनेत सहभागी होण्यासाठी ारहराशीह.ळप या लिंकवर अर्ज उपलब्ध आहेत. आधार, रेशनकार्ड, जातीचा दाखला आदी कागदपत्रे स्कॅन करून बुधवार (दि. 15) पर्यंत अर्ज पाठवावेत. यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व तालुकाध्यक्षांनी तालुका पातळीवर मदत कक्ष सुरू केली आहेत, अशी माहीती राज्य पशुसंवर्धन समिती सदस्य दांगडे-पाटील यांनी दिली.