मेक्सिको भूकंपाने हादरले, 248 बळी

0

मेक्सिको सिटी : मेक्सिको शहरात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या 7.1 रिश्टल स्केल तीव्रतेच्या भीषण भूकंपात 248 जणांचे बळी गेले असून, शेकडो नागरिक अत्यवस्थ आहेत. एक शाळा कोसळल्याने मलब्याखाली दबून 21 मुलांचा बळी गेला. तर आठ जणांसह 30 मुले अद्यापही बेपत्ता होती. शहराचे महापौर मिगुएल मेन्सेरा यांच्या माहितीनुसार, या शक्तिशाली भूकंपात 44 ठिकाणी इमारती कोसळल्या असून, तातडीने मदत व बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. भूकंपाचे धक्के बसू लागताच हजारो नागरिक रस्त्यावर आले. जखमींवर तातडीच्या उपचारासाठी सर्व रुग्णालयांना निर्देश देण्यात आल्याचेही महापौरांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या नैसर्गिक प्रकोपाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. आम्ही आपल्यासोबत आहोत, आणि नेहमीच सोबत राहू, या शब्दांत ट्रम्प यांनी ट्वीट केले. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 11.45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसण्यास सुरुवात झाली होती. भूकंपाचा केंद्रबिंदू प्युबला राज्यातील चिआउतला डीतापिया भागापासून पश्चिमेला सात किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाचे धक्के मोरलोस स्टेट, मेक्सिको सिटी, प्युबला स्टेट, स्टेट ऑफ मेक्सिको आणि गुरेरो स्टेट या भागांतही जाणवलेत.

मेक्सिकोत 44 ठिकाणी इमारती कोसळल्या
मेक्सिको शहराच्या महापौरांनी सांगितले की, भूकंपामुळे शहरातील 44 ठिकाणी इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये एक प्राथमिक विद्यालयदेखील असून, अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. एक आठवड्यापूर्वीही मेक्सिकोमध्ये भूकंप आला होता. ज्यामध्ये 98 नागरिक मृत्युमुखी पडले होते. मेक्सिकोचे गृहमंत्री मिग्युल एंजल ओसोरियो चोंग यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले की, बचावकार्य करणार्‍या पथकातील जवान मलब्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत असून, त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

शहरात सुमारे 117 ठार
अमेरिकन भूवैज्ञानिकांनी सांगितले की, भूकंपाचे केंद्र मेक्सिको सिटीपासून 120 किलोमीटरवर असलेल्या प्युबला प्रांतातील अटेंसिगोजवळ 51 किलोमीटर खोल होते. भूकंपामुळे मॉरलियोस राज्यात 55 लोक मरण पावले असून, प्युबलामध्ये 29 जण मरण पावले. तसेच दक्षिण मेक्सिकोमध्ये शाळा, कार्यालये आणि बाजार बंद करण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्र परिषदेनेही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मेक्सिकोला मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र तयार आहे, असेही म्हटले आहे.

32 वर्षांपूर्वी याच तारखेला आला होता विनाशकारी भूकंप
प्युबलाचे गव्हर्नर ज्योस एंटोनिया यांनी सांगितले की, भूकंपादरम्यान मेक्सिकोच्या पोपोकाटेपेल ज्वालामुखीत स्फोट झाल्याने एक चर्च कोसळले आहे. यामध्ये 15 लोक मरण पावले. मेक्सिकोमध्ये 32 वर्षांपूर्वी याच तारखेला आलेल्या भूकंपात सुमारे 10 हजार नागरिक मरण पावले होते.

शेजारील राष्ट्रांचा मदतीचा हात
मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी देशातील नागरिकांना आवाहन केले आहे की, लोकांनी रस्त्यांवर उभे राहू नये, जेणेकरून तातडीच्या सेवा दुर्घटनाग्रस्तांपर्यंत पोहचू शकतील. मेक्सिकोमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला असून, सुमारे 40 लाख लोक अंधारात आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हिथर नॉर्ट यांनी मेक्सिकोला सर्वप्रकारची मदत करण्याचे अश्वासन दिले असून, अन्य काही राष्ट्रांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.