‘मेक इन इंडिया’चा बसला असाही फटका

0

नवी दिल्ली। भारताला हेलिकॉप्टर पुरवण्यासाठी रशियाबरोबर करार झाला आहे. या करारांतर्गत रशिया भारताला हलक्या वजनाचे व प्रतिकूल हवामानातही उडू शकणारे 200 कामोव 226 टी हेलिकॉप्टर पुरवणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात भारताला 60 हेलिकॉप्टर पुरवले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित हेलिकॉप्टर ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतातच तयार केले जाणार आहेत. परंतु, इथेच अडचण निर्माण झाली आहे. कारण भारतात तयार होणारे हे हेलिकॉप्टर त्याच्या मूळ किमतीपेक्षा तब्बल अडीचपट महाग असतील, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

सध्या सियाचीन आणि लडाखसारख्या भागात चिता आणि चेतक हे हेलिकॉप्टर सेवा बजावतात. पण त्यांच्यापेक्षाही अत्याधुनिक हेलिकॉप्टरची भारतीय लष्कर आणि हवाईदलाला तातडीने गरज असल्याने रशियाबरोबर कामोवसाठी करार झाला. परंतु, याच्या किंमत आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावरून आता गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

तथापि संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितलेल्या माहितीनुसार, भारतात हा प्रकल्प उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागेल. त्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यामुळे खर्चात वाढ होईल, असे म्हटले. सुरूवातीला सरकारने एचएलला भारतातील भागीदार म्हणून निवडले होते. नंतर खासगी क्षेत्रातील कंपनीच्या संयुक्त भागीदारीने याची निर्मिती करण्याचे निश्चित करण्यात आल्याने याच्या किमतीत वाढ झाल्याचे समजते.

इंडो-रशिया सरकारच्या करारांतर्गत भारत 200 कामोव 226 टी हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. यातील 60 हेलिकॉप्टरचा पुरवठा रशिया करेल. उर्वरित 140 हेलिकॉप्टरची निर्मिती कामोव आणि हिंदुस्तान ऍरानॉटिकल (एचएएल) यांच्या भागीदारीत होईल. परंतु, या वाटाघाटी दरम्यान असं आढळून आलं की, भारतात तयार होणार्‍या 140 हेलिकॉप्टरचा खर्च हा रशियातून येणार्‍या 60 हेलिकॉप्टरपेक्षा अडीच पटीने जास्त आहे. त्यामुळे ही विमाने अधिग्रहित करण्यावरून काही मुद्दे समोर आल्याचे, संरक्षण विभागातील सूत्रांनी ‘मेल टुडे’ला सांगितले. या करारातील प्रगतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात पुढील महिन्यात मॉस्को येथे होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे. या बैठकीत याबाबत चर्चा होईल, असे बोलले जाते.