बर्लिन । अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची स्वसरंक्षणवादी भूमिका आणि जागतिक कार्बन ऊत्सर्जनसंदर्भात 2015 मध्ये झालेल्या पॅरिस करारामधून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या जर्मनीने आता भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे हवामान बदलाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत आणि जर्मनीतील गुंतवणूकदारांना भारतात आमंत्रित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जर्मनीचा दौरा फायदेशीर ठरू शकतो. सत्तापरिवर्तनानंतर अमेरिकेचे युरोपियन देशांशी संबंध ताणले असल्यामुळे त्याचा फायदा भारतासह आशियाई देशांना मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेपासून सध्या दुरावलेल्या जर्मनीला भारतासारख्या चांगल्या जोडीदाराची आवश्यकता आहे. त्यामुळे मेक इन इंडिया डिप्लोमसी यशस्वी करण्यासाठी नरेंद्र मोदींकडे चांगली संधी आहे. सध्या जगभरात तयार झालेल्या अमेरिकाविरोधात निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा उचलण्याचा नरेंद्र मोदीही प्रयत्न करत आहेत. भारताप्रमाणे जर्मनीने चीनकडेही मैत्रीचा हात दिला आहे. नरेंद्र मोदींशी चर्चा करण्याआधी जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांनी चीनचे पंतप्रधान ली केचियांग यांच्याशी चर्चा केली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी व्यापार आणि आपापसातील सहकार्याबाबत लूक ईस्ट ही रणनीती अवलंबवली होती. आता अमेरिकेशी असलेल्या संबधात दुरावा निर्माण झाल्यानंतर मर्केलही ओबामा यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणार, असे चित्र पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या भेटी देण्यात आलेले आमंत्रण हे त्याच रणनीतीचा भाग असल्याचे समजले जाते. अर्थात जर्मनीचा हा बदलता दृष्टीकोन भारताच्या दृष्टीने फायदेशीर आहे. जर्मनीसह पूर्ण युरोप अमेरिकेवर अवलंबून राहणार नाही हे मर्केल यांनी आधीच जाहीर केले. त्यांचे हे विधान जर्मनीला भारताशी मैत्रीचे नाते आणखी घट्ट करायचे असल्याचे संकेत आहेत.
8 करारांवर स्वाक्षर्या
रेल्वेच्या आधुनिकीकरणात जर्मन कंपन्यांची मदत घेणार. स्टार्टअपसाठी जर्मन कंपन्यांचे सहकार्य. गंगा सफाई अभियानात जर्मनीची मदत. जागतिक दहशतवादाच्या विरोधात जर्मनीच्या सोबत. स्मार्ट सिटी उपक्रमासाठी जर्मनीचे सहकार्य मिळणार. मेक इन इंडियासाठी जर्मन कंपन्यांचे स्वागत. लोकशाही मूल्यांची देवाणघेवाण. युरोपियन समुदायातील जर्मनीकडून भारतात सर्वाधिक परकीय चलन.
जर्मनीला भारताचा पाठिंबा
जुलै महिन्यात जर्मनीत जी 20 बैठक होणार आहे. भारत आणि चीन जी 20 चे सदस्य आहेत. या बैठकित भारताला कुठल्याही जर्मनीला आपल्या बाजूला झुकवावे लागेल. जर्मनीतील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी जी 20 साठी जर्मनीला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. इतिहासावर नजर टाकली तर जर्मनी आणि चीनचे संबंध नेहमीच गुंतागुंतीचे राहिले आहेत. भारताशी जर्मनीचे संबंध फारसे सलोख्याचे नव्हते हे लक्षात घ्यावे लागेल.