मेक इन कोकण

0

कोकण नैसर्गिक साधनसामग्रीने समृद्ध असलेला प्रदेश. ठाणे जिल्ह्यातील घोल वडपासून सिंधुदुर्गमधील बांदापर्यंत पसरलेला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून जवळ, तरीही दुर्लक्षित भाग, कधी काळी मनी ऑर्डरवर जगणारा इथला माणूस आज स्वतःच्या पायावर आणि कर्तृत्वावर उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. आजवर अनेक मुख्यमंत्री, मंत्री कोकणातून गेले. परंतु, विकासाची गंगा काही कोकणात अवतरली नाही.

सर्वात जास्त पाऊस पडूनही तो अडवण्याची आणि जिरवण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारमध्ये नाही. पावसाचं सारं पाणी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी अडवून कोकणचा कॅलिफोर्निया करता येऊ शकेल.पाण्याबरोबरच विपुल खनीज संपत्ती, सुंदर नितळ सागरी किनारे, आंबा, काजू, चिकू यांचे उत्पादन एवढे सारे असूनही कोकण मागे का?

डहाणू, बोईसर येथील उद्योग, जयगड येथील जिंदालचा ऊर्जा प्रकल्प, रत्नागिरी येथील फिनॉलेक्स आणि गद्रे फिशरीज, नागोठणेजवळ जिंदाल स्टील, महाड आणि लोटे परशुराम येथील केमिकल झोन, गुहागर इथला रत्नागिरी गॅस, कोकणात असलेले हे एवढेच उद्योग प्रकल्प आहेत. त्यात वाढ व्हायला हवी.
कोकणी मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून काही वर्षांपूर्वी गुरुनाथ कुलकर्णी, गुणवंत मांजरेकर यांनी परळ येथील दामोदर हॉलच्या पटांगणात कोकणी बाजारपेठ भरवली होती. कोकणी वस्तूला मुंबईत कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी म्हणून केलेला तो प्रामाणिक प्रयत्न होता. त्यानंतर या जत्राचे पीक मोठ्या प्रमाणात उगवले. मात्र, याचा मूळ उद्देशच आज हरवून गेला आहे.

कोकणात उद्योगनिर्मिती आणि गावागावांत रोजगार निर्माण करण्यासाठी मेक इन कोकणची गरज आहे.काही मंडळी या प्रश्‍नावर आज प्रामाणिकपणे कामही करताहेत. निसर्गाची सर्वाधिक समृद्धी कोकणात आहे.कृषीपर्यटन, मत्स्यपालन, वनौषधी, आधुनिक शेती, चिकू, आंबा, काजू, फणस, बांबू, नारळ, मसाले इत्यादी माध्यमातून हजारो उद्योग निर्माण करता येतील. योग्य मार्गदर्शन, आधुनिक प्रशिक्षण व्यवस्था, बँकांचा अर्थपुरवठा, शहरांशी मार्केटिंगचा समन्वय आदी गोष्टी जुळून आल्या, तर मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोकणची संकल्पना इथल्या बाजारात उभी राहू शकेल.

कोकणात नारळ उत्पादन खूप आहे. रत्नागिरी येथील भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. राष्ट्रीय कोकोनेट बोर्डही आहे. परंतु झावळ्या, करवंटी, काथ्या यापासून तयार होणारा उद्योग मात्र कोकणात नाही. त्याचबरोबर लाखो टन काजूची बोंडे दरवर्षी फुकट जातात यावर प्रक्रिया करणारी व्यवस्था नाही. द्राक्षापासून वाइन बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रात आहे, तसा काजूपासून वाइन बनवण्याचा प्रकल्प कोकणात नाही. ही सर्व काजूची बोंडे केरळ, गोव्यातले व्यापारी घेऊन जातात याकडे राज्यकर्त्यांबरोबर सहकार चळवळीनेही लक्ष देण्याची गरज आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात जशी सहकारी चळवळ रुजली तशी ती कोकणात रुजली पाहिजे.

कोकणातील विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. जी इच्छाशक्ती समाजवादी नेते प्रा. मधु दंडवते यांनी दाखवली. बॅरिस्टर नाथ पै, वालावलकर यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न दाखवले आणि जनता सरकार येताच ते दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी पूर्ण केले. ती इच्छाशक्ती पळस्पे ते इंदापूर हा 76 कि.मी.चा रस्त्याचे चौपदरीकरण होताना दिसत नाही. मुंबई ते सोलापूर, कोल्हापूर, धुळे हे रस्ते चारपदरी केव्हाच झाले. मग मुंबई गोवा चारपदरी कधी होणार? सागरी मार्ग कधी पूर्ण होणार, हे कुणालाच माहीत नाही. या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या शिवाय कोकणचा विकास दृष्टिक्षेपात येणार नाही.

ग्लोबल वार्मिंगच्या काळात प्रदूषणकारी प्रकल्प कोकणातील जनतेच्या माथी मारण्यासाठी ग्रीन रिफायनरी या गोंडस नावाखाली कोकणच्या विनाशाला एका बाजूने निमंत्रण दिले जातेय. राजापूर येथील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाजवळील परिसरात 14 गावांमध्ये सर्वात मोठी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जातोय. याविरोधात हळूहळू असंतोष वाढतोय. कोकणाला विनाशकारी प्रकल्प नकोत तर पर्यटनपुरक, लाल मातीतले जगण्याची उमेद वाढवणारे उद्योग हवेत.राज्यकर्त्यांकडून तेवढीच अपेक्षा आहे.
-शरद कदम
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, मुंबई