दहा दिवस चालणार सर्वेक्षण : तापी विकास महामंडळाची योजना
फैजपूर- रावेरसह यावल, चोपडा व विदर्भातील शेतकरी व जनतेसाठी वरदान ठरणार्या मेगा-रीचार्ज अर्थात महाकाय जलपुर्नभरण योजनेसाठीचे हवाई सर्वेक्षण सोमवार, 13 ऑगस्टपासून होणार आहे. त्याच्या पूर्व तयारीसाठी धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात हे सर्वेक्षण पुढील दहा दिवस चालणार आहे. मेगा रीचार्ज अंतर्गत तापी नदीच्या खोर्यातील गाळाची जमिनीचे सर्वेक्षण हवाई लेडर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणार आहे. सर्वेक्षण करण्यासाठी मे.जिओकनो या खाजगी कंपनीला नियुक्त करण्यात आले. तापी विकास महामंडळातर्फे ही योजना अंमलात येणार आहे
तापीच्या पुराचे पाणी येणणार सातपुड्याच्या पायथ्यापर्यंत
गेल्या काही वर्षांपासून या महत्वाकांक्षी योजनेचा पाठपुरावा सुरू आहे. तापीनदी वरील महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्याकरीता हा प्रकल्प राबविण्यात येत असून त्याच्यासाठी पाणी अडविण्यासाठीचे धरण (पिकअप वेअर) मध्यप्रदेशातील हरीया गुटी घाट येथे बांधण्यात येणार आहे. हा बंधारा वळणाचा राहणार असून तापी नदीच्या पुराचे पाणी कालव्याच्या माध्यमातून महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सातपुड्याच्या पायथ्यापर्यंत आणण्यात येणार आहे. या द्वारे संपूर्ण नदी नाल्यां मध्ये पुराचे पाणी सोडून जमिनीत पाणी जिरवण्यासाठी व पर्यायाने भूजल पातळी वाढविण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. बर्हाणपूर, रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर तसेच विदर्भातील जळगाव जामोद, आकोट, अंजनगाव सुर्वे या कोरड्या भागात त्याचा फायदा होऊन जवळपास पाउणे चार लाख हेक्टर जमिनीची भूजल पातळी वाढणार आहे. त्यासाठी उजवा कालवा हा दोनशे 220 किलोमीटरचा व डावा कालवा हा 280 किलोमीटरचा असेल. हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी तापी विकास महामंडळाचे अधिकारी प्रयत्नशील आहे. दरम्यान, रविवारी, धनाजी नाना महाविद्यालयच्या पटांगणात हवाई दलाचे हेलिकॉप्टर सर्वेक्षण हवामान खराब असल्यामुळे त्या ठिकाणी उतरवण्यात आले होते. यावेळी आलेल्या पथकाशी आमदार हरीभाऊ जावळे, राज्य माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील यांनी चर्चा केली.
सर्वेक्षणाला अशी होईल सुरवात
सोमवारपासून सुरू होणार्या हवाई सर्वेक्षण हे सातपुड्याच्या पायथ्याशी चोपडा तालुक्यातील अनेर नदीपासून यावल,रावेर, बर्हाणपूर, नेपानगर, धारणी (उजवा कालवा) पुन्हा धारणी बर्हाणपूर, जळगाव जामोद, आकोट, अचलपूरपर्यंत होणार आहे.
दहा दिवसात होणार सर्वेक्षण
अत्याधुनिक हवाई सर्वेक्षण असल्यामुळे मेगा रिचार्ज प्रकल्पाचा सर्वेक्षण दहा दिवसात होणार आहे. रस्त्याद्वारे हेच सर्वेक्षण केले असते तर किमान दोन वर्षे लागली असती, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.