सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेस-भाजपमध्ये रस्सीखेच
काँग्रेसचा सरकार स्थापनेचा दावा; भाजपच्याही हालचाली सुरू
शिलाँग : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता मेघालयात नवे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. निवडणुकांमध्ये 21 जागांसह आघाडीवर असलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेत येऊ न देण्यासाठी भाजप, एनपीपी आणि यूडीपी या मित्र पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली होती. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्षदेखील राज्यातील इतर पक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात असून, सत्तेसाठी राज्यात सध्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांनी अपक्षांवर फासे फेकण्यास सुरुवात केली होती.
11 जागांवर दोघांचाही डोळा
राज्यातील सहा जागांवर विजय मिळवलेल्या यूडीपी या पक्षाने एनपीपी आणि भाजपला आपला पाठिंबा दर्शविलामुळे भाजप आणि मित्र पक्षांच्या खात्यात सध्या 27 जागा जमा झाल्या आहेत. तर आणखीन दोन पक्षांचा आणि काही अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा मिळवून सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न भाजप आणि एनपीपी करत आहेत. तर या उलट 21 जागांवर आघाडीवर असलेला काँग्रेसदेखील राज्यातील अपक्ष उमेदवार आणि इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्तास्थापनेसाठी दावा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान एनपीपी, भाजप, यूडीपी आणि काँग्रेस वगळता राज्यातील एकूण 11 जागा या इतर पक्षांना आणि काही अपक्ष उमेदवारांना मिळाल्या आहेत. त्यामुळे या 11 जागांचा पाठिंबा आपल्याला मिळावा यासाठी आघाडीचे पक्ष प्रयत्न करत आहेत. परंतु भाजप आणि एनपीपीच्या सुदैवाने यातील काही पक्ष हे काँग्रेसविरोधी असल्यामुळे भाजप-एनपीपीला याचा फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु, या विषयी अजून ठोस निर्णय कोणत्याही इतर व पक्ष उमेदवारांकडून घेण्यात आला नसून, या 11 जागांवरच मेघालयचे भविष्यसध्या अवलंबून असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसचा सत्तास्थापण्याचा दावा, भाजपही राज्यपालांची भेट घेणार
निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे. शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसचे मेघालय प्रदेशाध्यक्ष विन्सेंट पाला आणि महासचिव सी. पी. जोशी यांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठीचे पत्र दिले. दरम्यान, भाजपनेही मेघालयमध्ये सत्ता स्थापन्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्याने संविधानिक नियमानुसार काँग्रेसला लवकरात लवकर सरकार बनविण्यासाठी निमंत्रण द्यायला हवे. निश्चित तारखेला विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करू, असे या पत्रात काँग्रेसने म्हटले आहे. एकीकडे पाला आणि जोशी यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कमलनाथ आणि मुकुल वासनिक यांनी इतर पक्ष आणि अपक्षांशी चर्चा करून पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यपालांना पत्र देऊन सरकार बनविण्यासाठी काँग्रेसने दावा केल्याच्या वृत्ताला कमलनाथ यांनी दुजोरा दिला आहे. ईशान्य भारतात त्रिपुरा आणि नागालँडनंतर मेघालयमध्येही भाजप सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मेघालयमध्ये भाजप एनपीपी, यूडीपी आणि एचएसपीडीपीसह 29 आमदारांची यादी घेऊन राज्यपालांची भेट घेणार आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या मॅजिक फिगरपेक्षा हा आकडा कमी आहे. मेघालयमध्ये बहुमतासाठी 30 सदस्यांची गरज आहे.