मेजर ध्यानचंदासाठी भारतरत्न मागू नका

0

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मार्गदर्शक ए. के. बसंल यांचे मत

नवी दिर्ल्ली । मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी मागील काही वर्षांपासून केली जात आहे. मात्र भारतीय हॉकी संघाचे माजी मार्गदर्शक ए. के. बंसल यांनी प्रश्‍न उपस्थित करत, अशा तर्‍हेच्या मागणीमुळे हॉकीचे जादुगार म्हणून संबोधल्या जाणार्‍या ध्यानचंद यांच्या कामगिरीचे महत्व कमी होत असल्याचे सांगितले. दिल्ली क्रीडा पत्रकार संघटना आणि भारतीय शारिरीक शिक्शण फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व या विषयावर आयोजित परिसंवादात बोलताना बसंल यांनी हे मत व्यक्त केले.

बंसल म्हणाले की, ध्यानचंद यांना भारतरत्न द्या अशी मागणी का करत आहोत हेच कळत नाही. त्यांची कामगिरी, दर्जा हे या पुरस्काराहून अधिक मोठे आहे. अशी मागणी करून खरतर त्यांचे महत्व कमी करतोय. आता पुरस्कार मिळेपर्यत ही मागणी होतच राहणार.
ध्यानचंद यांना हा पुरस्कार जाहिर झाल्यास भारतरत्न किताबाचा सन्मान वाढेल असे माझे मत आहे. ऑलिम्पियन बॉक्सर अखिलकुमारने यावेळी बोलताना क्रीडा संस्कृती वाढवण्यावर जोर दिला. अखिलकुमार म्हणाला की, देशात अजूनही खेळांचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. हा विकास साधण्यासाठी शाळांमधून प्रयत्न करावे लागतील. लोकांमध्ये अजूनही खेळांच्याबाबतीत जागरूकता निर्माण झालेली नाही.