पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा धडाका कायम राहावा, यासाठी नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारने या प्रकल्पासाठी 248 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी 218 कोटी समभागाच्या (इक्विटी) स्वरूपात, तर उर्वरित 30 कोटी रुपये बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरुपात दिले जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या 31 किमीच्या मार्गासाठी 11 हजार 420 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 1 हजार 310 कोटी रुपये राज्य सरकारचे समभाग आहेत. राज्याने मागील दोन वर्षांत 90 कोटी रुपयांचा निधी महामेट्रोला प्रदान केला होता. 2018-19 च्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आणखी 70 कोटी रुपये पुणे मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात आले होते. नव्या वर्षातही याच गतीने काम पूर्ण करण्यासाठी सरकारने महामेट्रोला अतिरिक्त निधी मंजूर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत.