मेट्रोचा प्रवास महागला

0

मुंबई । मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये मंगळवारपासून वाढ होणार आहे. मेट्रो वनकडून आज अनपेक्षितपणे यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. मेट्रोच्या परतीच्या प्रवासाच्या टोकन आणि ट्रिप पासच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना रिटर्न प्रवासासाठी पाच रूपये जास्त मोजावे लागणार आहेत. तर 2 ते 5 किमी टप्प्यातील प्रवासाच्या तिकीटात 1 रुपया 66 पैसे, तर 5 ते 8 किमी प्रवासाच्या तिकीटात 3 रुपये 33 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ट्रिप पासवरील डिस्काऊंट 50 टक्के होते. आता 8 किलोमीटरचा एक टप्पा याप्रमाणे मेट्रोच्या भाड्याची पुनर्रचना करण्यात आली आहे.

रोज अडीच ते तीन लाख लोक प्रवास करतात
सध्या दररोज सुमारे अडीच ते तीन लाख मुंबईकर मेट्रोने प्रवास करतात. या प्रवाशांना आता तिकीट दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. रिलायन्स इन्फ्राच्या मुंबई मेट्रो वन प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून खासगी-सार्वजनिक भागीदारीतून राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात रिलायन्स इन्फ्राची भागीदारी 69 टक्के, तर एमएमआरडीएचा वाटा 25 टक्के आणि फ्रान्सच्या व्हेओलिया कंपनीचा हिस्सा 6 टक्के आहे. 1 डिसेंबर 2015पासून मेट्रोच्या भाड्यात 5 रुपये वाढ करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वनने घेतला. या निर्णयाविरुद्ध एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

एमएमआरडीएवर बोजा लादण्याचा प्रयत्न
रिलायन्सकडून मेट्रोच्या तोटयचे ओझे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) खांद्यावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तिकीट दरवाढीवर न्यायालयीन अंकुश आणि प्रकल्पाचा वाढीव खर्च देण्यास एमएमआरडीएने दाखविलेली असमर्थता यामुळे मुंबई मेट्रो वन प्रा. लि.चा (एमएमओपीएल) तोटा दिवसेंदिवस वाढत असल्याने हा प्रकल्पच प्राधिकरणानेच चालवावा यासाठी अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स इन्फ्रा’ने दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती.