पुणे । पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाबरोबरच अन्य सात मार्गांवर मेट्रोचे जाळे विस्तारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी पीएमआरडीएने प्रस्तावित असलेल्या या मार्गांवर प्री फिजीब्लिटी रिपोर्ट तयार करून घेण्यासाठी दिल्ली मेट्रोला पत्र दिले आहे. या प्रकल्पामुळे शहरभर मेट्रोचे जाळे विस्तारले जाणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सोयीचा होण्यास मदत होणार आहे.
पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटर लांबीच्या इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच प्राधिकरणाला मान्यता दिली. त्यानंतर पीएमआरडीएने या कामासाठी जागतिक निविदा मागवून अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले. या अहवालाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम बीओटी तत्वावर करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीए वेगाने काम करत आहे.
प्रस्तावित मेट्रोचे मार्ग
शिवाजीनगर ते हडपसर, वनाज ते हिंजवडी, स्वारगेट ते खडकवासला, चंदननगर – मगरपट्टासिटी, चंदननगर ते वाघोली, कोथरूड ते पाषाण आणि सिंहगड रोड ते कोथरूड असे शहरातील मेट्रोचे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहे.
शहरभर पसरणार जाळे
हे आठ मार्ग निवडताना पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गांना जोडणारे हे मार्ग असणार आहे. याशिवाय हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाला पूरक असे ते मार्ग असणार आहे. जेणेकरून शहरात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभे राहण्यास मदत होणार आहे.
प्री फिजीबीलीटी रिपोर्ट तयार करणार
या मार्गाच्या प्री फिजीबीलीटी रिपोर्ट करण्यासंदर्भात दिल्ली मेट्रोला नुकतेच पत्र दिले आहे. हिंजवडी-शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यानंतर त्यातून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता समोर येईल. त्यांनतरच पुढील मार्गाचे काम हाती घेण्यात येईल, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.
आणखी आठ मार्गांवर मेट्रो
हिंजवडी ते शिवाजीनगरबरोबरच पीएमआरडीएने शहरातील आखणी आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे मार्ग निवडण्यात आले होते. या मार्गांची प्री फिजीब्लिटी रिपोर्ट तपासणी करून त्यानंतर ते मार्ग निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी दिल्ली मेट्रोच्या अधिकार्यांशी यापूर्वीच दोन वेळा बैठका देखील झाल्या. त्यानुसार यामार्गांची प्री फिजीब्लिटी रिपोर्ट तपासणीचे काम दिल्ली मेट्रोला दिले आहेत. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे मार्ग निश्चित करण्यात येणार आहे.