महापौरांचे मेट्रो संचालकांना पत्र
पिंपरी चिंचवड ः महामेट्रो प्रकल्पातंर्गत स्वारगेट ते पिंपरी या मार्गाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. मार्चअखेर पिंपरी ते दापोडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मेट्रोला पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचे देखील नाव देण्यात यावे, याकरिता सत्ताधारी भाजप आणि विरोधी सर्वपक्षीय पदाधिका-यांचा प्रयत्न सुरु झाला आहे. मात्र, मेट्रोचे ‘पिंपरी-चिंचवड-पुणे मेट्रो’ अशी मागणी भाजप महापौर माई ढोरे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत मेट्रोच्या कामासंदर्भात मंगळवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डिकर, मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिर्हाडे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र गावडे, निर्मला कुटे आदी उपस्थित होते.
वाहतुक व्यवस्था सुरळीत होणार….
निवेदनात म्हटले आहे की, मार्च 2018 मध्ये मेट्रो प्रकल्पात तीन मेट्रो मार्गीका आहेत. त्याची एकूण लांबी 54. 58 किलोमीटर आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना मेट्रोमुळे एक प्रभावी शहरी वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. हा प्रकल्प केवळ पुणे शहरापुरता मर्यादित नसून पिंपरी चिंचवड शहराचाही त्यात समावेश आहे. केंद्र – राज्य सरकार, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांचा आर्थिक हिस्सा आहे. सध्या मेट्रो प्रकल्पाच्या पुणे मेट्रोे या नावात केवळ पुणे शहराचा नामोल्लेख दिसून येतो. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश करून पिंपरी चिंचवड पुणे मेट्रोे असे नामकरण करण्यात यावे. तसेच मेट्रोचा निगडीपर्यंत मार्ग वाढविण्यात यावा, अशी मागणी महापौर ढोरे यांनी केली आहे.