केंद्रीय पुरातत्त्व कायद्यात बदल करावा लागणार
पुणे : मेट्रोची नगर रस्त्यावरून कल्याणीनगरमार्गे रामवाडीला जाण्याची ‘अलाइनमेंट’ राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर केली आहे. तर, आगाखान पॅलेससमोरून मेट्रो भूमिगत करण्यासाठी दिल्लीत प्रयत्न करण्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. परंतु, त्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व कायद्यात बदल करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे अलाइनमेंटबाबत संभ्रम कायम आहे.
वनाज-रामवाडी मेट्रोच्या नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेससमोरील मार्गाला केंद्रीय पुरातत्त्व प्राधिकरणाने आक्षेप घेतला आहे, त्यामुळे याबाबतचे काम बंद आहे. त्यामुळे महामेट्रोने मेट्रोच्या अलाइनमेंटमध्ये बदल करून कल्याणीनगरमधून मेट्रो रामवाडीपर्यंत नेण्याचे ठरविले आहे. सुधारित अलाइनमेंट त्यांनी राज्य सरकारकडे पाठविली. ती मंजूर करून केंद्रीय नगरविकास खात्याकडे सादर केली आहे.
आगाखान पॅलेसजवळील काम थंडावले
दरम्यान, पुरातत्त्व खात्याच्या नियमाप्रमाणे आगाखान पॅलेससमोरून एलिव्हेटेड किंवा भुयारी मार्गानेही मेट्रो जाऊ शकत नाही. भुयारी मेट्रो करायची असेल, तर कायद्यातील तरतुदींमध्येच बदल करावा लागणार आहे. आता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज संपले आहे, त्यामुळे कायद्यात बदल होण्याची प्रक्रिया तूर्त तरी शक्य नाही. केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने अध्यादेश काढला, तरच भुयारी मेट्रोचा मार्ग सुकर होईल, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, अध्यादेश काढण्याची हालचाल सुरू नाही. पालकमंत्र्यांनी आगाखान पॅलेसजवळील काम धीम्या गतीने करण्याची सूचना केल्यामुळे तेथील काम जवळजवळ थंडावले आहे. कायद्यात बदलाची प्रक्रिया किचकट असल्यामुळे भुयारी मेट्रोची घोषणा हवेतच विरण्याची शक्यता आहे.