मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सुनील म्हस्के यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील 20 टक्के काम पूर्ण झाले असून, हे काम सुरु नसताना पिंपरी-चिंचवड शहराने या कामात चांगली आघाडी घेतली आहे. या कामांतर्गत 88 पिलरचे फाउंडेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सुनील म्हस्के यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी ते दापोडीदरम्यान हे काम सुरु करण्यात आले आहे. हे साडे सहा किलोमीटर अंतरावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 50 पिलर उभारण्यात आले आहेत. सध्या हॅरिस ब्रीजजवळ पाया खोदण्याचे काम सुरु असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे महापालिका हद्दीत मेट्रोच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. या मेट्रोच्या उभारणीत या पिलरची मिना ऊंची साडे पाच मीटर आहे. तर नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपुलावरुन जाणार्या मेट्रोच्या पिलरची उंची सर्वाधिक 17.5 मीटर असणार आहे, असेही म्हस्के म्हणाले.
135 झाडे मुळासकट उपटणार
पहिल्या टप्प्यातील मेट्रो पिंपरीपर्यंत न ठेवता ती निगडीपर्यंत आणण्याची सामाजिक संस्थेची आग्रही मागणी आहे. त्याकरिता शासनस्तरावर पाठपुरावा देखील सुरु आहे. जनमताचा रेटा लक्षात घेऊन, मेट्रोचा निगडीपर्यंतचा डिपीआर तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मेट्रोच्यावतीने पिंपरी ते निगडी दरम्यानच्या मार्गिका सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. जूनअखेर हे काम पूर्ण होणार आहे. मेट्रोच्या मार्गातील पूर्ण वाढ झालेली एकूण 135 झाडे मुळासकट काढली जाणार आहेत. त्यापैकी एकूण 14 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. 9 झाडे वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात तर उर्वरित पाच झाडे पुण्यातील डेक्कननजीकच्या नदीपात्रात करण्यात आली आली आहेत. याशिवाय, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानेदेखील वृक्षारोपणाकरिता जागा उपलब्ध करु दिली आहे.
तांत्रिक आराखड्यात बदल करणार
पहिल्या टप्प्यात मेट्रो पिंपरीपर्यंत आणण्याचे ठरविण्यात आल्याने मोरवाडी येथे मेट्रोचा ट्रॅक बदलण्यासाठी या आराखड्यात तांत्रिक बदल सुचविण्यात आले आहेत. मात्र, पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचे सर्वेक्षण सुरु असल्याने मेट्रोच्या ट्रॅक बदलण्याचे तांत्रिक बदल तसेच कायम ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय नाशिकफाट्याच्या परिसरात आणखी असा तांत्रिक बदल करण्यात येणार असून, मेट्रोत तांत्रिक बिघाड झाल्यास मेट्रो वळविणे सोपे होणार आहे.