मेट्रोच्या कामामुळे पश्‍चिम उपनगरातील रस्ते वाहतूक मंदावली

0

मुंबई । पश्‍चिम उपनगरातील मेट्रोचे काम जलद गतीने होत असले, तरी एक्स्प्रेस वे आणि लिंक रोड परिसरात मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कासव गतीने सुरू असून त्याचा फटका वाहन चालक आणि खाजगी वाहतुकीला बसत आहे. मालाडपासून बोरिवलीच्या दिशेने जायला वाहनांना दोन ते तीन तास लागत असल्याने या मार्गावरून जायचे की नाही, असा प्रश्‍न अनेकांनी विचारायला सुरुवात केली आहे. रस्त्याच्या कडेला पडलेले साहित्य व मोठे पाइप यांचा तर वाहतुकीला अडथळा ठरत आहे. त्यातच अवजड साहित्य उचलण्यासाठी मोठे क्रेन आणल्याने त्याचा देखील अडथळा वाहतुकीला ठरत आहे.

वाहतूक पोलिसांवरील ताण वाढला
कायम वाहतूककोंडी असलेल्या या मार्गावर आता एसटी बसेसची संख्या वाढल्याने वाहतूक पोलिसांवरील ताण वाढला आहे. वाहतूक पोलिसांनीही त्याबाबत एसटी महामंडळास माहिती दिली असल्याचे सांगितले जाते. मुंबई सेंट्रल डेपोतून दररोज सुमारे 700 बसेस ये-जा करतात. बहुतांश बसेसच्या फे-या सायंकाळी 4 ते रात्री 10च्या सुमारास सुरू असतात. त्यामुळे भायखळा गाठण्यासाठीही अर्धा ते पाऊण तास जात असल्याची त्यांची तक्रार आहे. केवळ एसटी नव्हे तर बेस्ट उपक्रमासही त्याचा फटका बसत आहे. एसटी डेपोच्या जवळच असणा-या बेस्ट डेपोतूनही मोठ्या प्रमाणावर बसेस ये-जा करत असून इथल्या फे-यावरही कोंडीमुळे परिणाम जाणवत आहे.

स्वयंसेवक रात्री दिसेनात
मुंबई-अहमदाबाद हायवेला वाहतूक विभागाचे नियंत्रण आहे. मात्र, लिंकिंग रोडवर म्हणावे असे वाहतूक विभागाचे लक्ष नसल्याने वाहनचालकांची देखील अरेरावी होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या भागात वाहतूक कोंडीचा त्रास सोडवण्यासाठी विभागाने जे स्वयंसेवक नेमले आहेत, ते नेमलेल्या जागेवर नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.

रहिवाशांना सहन करावा लागतोय धुळीचा त्रास
दहिसरकडून वांद्र्याच्या दिशेने निघायचे म्हटले, तर तासन्तास निघून जातात. त्यामुळे लोकांना महत्त्वाच्या कामाला पोहोचता येत नाही, अशा नागरिकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करून रेल्वेने प्रवास करणे पसंत केले आहे.