मेट्रोच्या कामामुळे पीएमपीच्या फेर्‍या रद्द

0

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस फेर्‍या रद्द होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मेट्रोच्या कामामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे पीएमपीच्या बसला मार्गावर उशीर होत असल्याने या फेर्‍या रद्द होत आहेत, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून पीएमपीच्या दररोज पाच ते सहा हजार फेर्‍या रद्द होत आहेत. त्याचप्रमाणे पीएमपी बसचे ’ब्रेकडाउन’, अपघात, तसेच बसला आग लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकारांमुळे पीएमपी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याने पीएमपी प्रवासी मंचाचे संजय शितोळे यांनी याबाबत माहिती अधिकाराबाबत माहिती मागविली. यावर उत्तर देताना पीएमपी प्रशासनाने सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी उड्डाणपूल व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीत पीएमपीच्या बस अडकून पडतात. याचा परिणाम थेट पीएमपीच्या वेळापत्रकावर होऊन पीएमपीच्या फेर्‍या रद्द होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, येत्या वर्षभरात पीएमपीच्या ताफ्यात 150 ई-बस आणि 400 सीएनजी बस दाखल होणार आहेत. या बस संचलनात आल्यानंतर बसच्या ’ब्रेकडाउन’चे प्रमाण कमी होऊन फेर्‍या रद्द होण्याचे प्रमाणही कमी होणार आहे. सद्यस्थितीमध्ये बसला लागणार्‍या आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. ’ब्रेकडाउन’चे प्रमाण कमी करण्यासाठी डेपो स्तरावर विविध तांत्रिक उपाययोजना करण्याचे काम सुरू असल्याचे पीएमपी प्रशासनाने कळिवले आहे. आयुर्मान संपलेल्या तब्बल 436 बस रस्त्यावर उतरवून पीएमपी प्रशासन पुणेकरांच्या जीवाशी खेळ करत आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात 1294 स्वत:च्या मालकीच्या बस आहेत. मात्र, त्यापैकी 436 बस या आयुर्मान संपलेल्या आहेत. या बस दहा वर्षांपेक्षा जुन्या झाल्या आहे. त्यामुळे रस्त्यात बंद पडणे, अपघात होणे असे प्रकार घडतात. मोटार वाहन कायद्यानुसार दहा वर्षांपेक्षा जास्त जुन्या बस संचलनात आणता येत नाही. या बस स्क्रॅप करणे बंधनकारक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून पीएमपी प्रशासन या बसद्वारे धोकायदायक पद्धतीने प्रवासी सेवा पुरवत आहे.