मेट्रोच्या जागांचे प्रस्ताव एकत्रित द्या

0

अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांच्या महामेट्रोला सूचना

पुणे : मेट्रोला लागणार्‍या जागांचे प्रस्ताव एकत्रित द्या, अशा सूचना महामेट्रोला देणार असल्याचे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांनी सांगितले. मेट्रोला अनेक जागा विविध कारणांसाठी हव्या आहेत. त्याचे प्रस्ताव वेगवेगळे प्रशासनाकडे येतात. त्यापेक्षा किती जागा हवी आहे, कशासाठी हवी आहे, तात्पुरती आहे की कायमस्वरूपी हवी आहे, त्या ठिकाणी कोणती अ‍ॅक्टिव्हिटी केली जाणार आहे, याची सगळी माहिती द्यावी. तसेच ज्या विभागाच्या जागा हव्या आहेत, त्या विभागाच्या प्रमुखांशी आधी बोलूनच हे प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचनाही महामेट्रोला करणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

एखादा प्रस्ताव आल्यानंतर संबंधित विभागाकडून त्यावर कोणतातरी शेरा मारला जातो. त्यानंतर पुन्हा तो प्रस्ताव बारगळतो. यापेक्षा आधी संबंधित विभागाशी चर्चा करावी, कशासाठी, किती कालावधीसाठी जागा हवी आहे याची माहिती दिली जावी, त्यानंतर विभागाकडून हिरवा कंदील मिळाला की तो प्रस्ताव पुढे परवानगीसाठी सरकवला जावा, असेही त्यांना सुचवणार असल्याचे शर्मा म्हणाले.

भरपाई देणार

उद्यान विभागाच्या काही जागा महामेट्रोला हव्या आहेत, असा प्रस्ताव त्यांनी दिला होता. काही जागा महामेट्रोला तात्पुरत्या स्वरूपात हव्या होत्या. त्याठिकाणी एखादी भिंत पाडल्यास किंवा नुकसान झाल्यास त्याची भरपाई करून देण्यात येईल, असेही महामेट्रोतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र, उद्यान विभागाने महामेट्रोला जागा देण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी हे प्रस्ताव एकत्रीतच यावेत, हा या मागचा उद्देश असल्याचे शर्मा यांनी नमूद केले.