मेट्रोच्या नऊ स्थानकांसाठी 497 कोटींचे कंत्राट

0

पुणे । मेट्रो प्रकल्पांतर्गत पिंपरी-स्वारगेट मार्गावर नऊ स्थानके उभारण्याचे 497 कोटी रुपयांचे कंत्राट हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन लिमिटेड (एचसीसी) आणि अल फरा कंपनीच्या संयुक्त भागीदारीला मिळाल्याची माहिती महामेट्रोने शुक्रवारी दिली. येत्या पंधरा दिवसांत स्थानके उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.शहरात पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी हा अनुक्रमे 16.59 आणि 14.66 किलोमीटरचा मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. पिंपरी-स्वारगेट हा शिवाजीनगरपर्यंत एलिव्हेटेड तर, तेथून पुढे स्वारगेटपर्यंत भुयारी मार्ग आहे. वनाज-रामवाडी हा मार्ग संपूर्णतः एलिव्हेटेड आहे.

110 आठवड्यांमध्ये प्रकल्प होणार पूर्ण
पिंपरी-स्वारगेट मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका, तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी आणि रेंजहिल्स येथे जमिनीपासून उंचावर नऊ मेट्रो स्थानके बांधायची आहेत. त्यांना हा प्रकल्प 110 आठवड्यांमध्ये पूर्ण करायचा आहे. येत्या 15 दिवसांत संबंधित कंपनीला कार्यआदेश (वर्कऑर्डर) दिला जाईल. त्यानंतर लगेचच स्थानकांच्या उभारणीला सुरुवात होईल. एकावेळी दोन किंवा तीन स्थानके उभारण्याचे काम पिंपरीमधून सुरू होईल, असे महामेट्रोने स्पष्ट केले.

धान्य गोदाम जागेची मोजणी
शिवाजीनगर धान्य गोदामाची जागा महामेट्रोला नुकतीच मिळाली आहे. त्यातील नेमकी किती जागा द्यायची, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोजणी सुरू आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तीन दिवसांत मोजणी पूर्ण झाल्यावर महामेट्रोच्या ताब्यात जागा येईल. तसेच कृषी महाविद्यालयाची जागा ताब्यात देण्यासाठीही मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या चार दिवसांत ती पूर्ण होईल. त्यानंतर ती जागाही महामेट्रोच्या ताब्यात येणार असल्याचे सांगितले.